Join us

विमानतळ परिसरातील झोपड्यांच्या सर्व्हेस विरोध

By admin | Published: June 13, 2016 2:19 AM

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरालगतच्या २० हजार झोपड्यांचे सर्वेक्षण उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरालगतच्या २० हजार झोपड्यांचे सर्वेक्षण उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. मात्र सर्वेक्षणाबाबत रहिवाशांना काहीच माहिती देण्यात आली नसल्याने, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) त्याला विरोध केला आहे. शिवाय येथील रहिवाशांचे पुनर्वसन स्थानिक परिसरातच करण्यात यावे, या मागणीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशाराही पक्षाचे मुंबई सरचिटणीस रतन अस्वारे यांनी दिला आहे.दरम्यान, सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी सहारगाव, सावित्रीबाई फुले मार्ग, सम्राट अशोक मार्ग, संभाजी नगरमधील रहिवाशांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. या वेळी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी नितीन महाजन यांना निवेदनही सादर केले. या शिष्टमंडळात नगरसेविका विन्नी डीसोझा, माजी नगरसेवक सुभाष सावंत, निकोलस अल्मेडा, कमलेश राय, नरेश सावंत, अर्जुन माघाडे, भास्कर झिमरे, मिलिंद गमरे, विश्वास मर्चंडे, समीर कांबळे, सचिन तांबे, नितीश गायकवाड यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)