Join us

झोपड्यांनी नाले गाळात

By admin | Published: June 13, 2014 1:48 AM

मुंबई शहर आणि उपनगरातील नाल्यांच्या साफसफाईच्या कामात कुचराई केल्याप्रकरणी प्रशासनावर चिखलफेक करण्यात येत आहे

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील नाल्यांच्या साफसफाईच्या कामात कुचराई केल्याप्रकरणी प्रशासनावर चिखलफेक करण्यात येत आहे. पूर्व उपनगरासह पश्चिम उपनगरातील नाल्यालगतच्या झोपड्यांमधील रहिवासीच नाल्यात सुक्या आणि ओल्या कचऱ्याची भर घालत असल्याने नाल्यांवर कचरा तरंगत असल्याचे चित्र आहे.मागील दोन आठवड्यांपासून महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक नालेसफाईच्या कामांवरून एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. आयुक्त सीताराम कुंटे आणि महापौर सुनील प्रभू यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी नालेसफाईची पाहणी करत प्रशासनावर टीकेची झोड उठविली. शिवाय नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नालेसफाईचा मुद्दा आला आणि सभागृहात गदारोळ झाला.वांद्रे-कुर्ला संकुलाकडे कुर्ला डेपो येथून जाणाऱ्या मिठी नदीलगतही झोपड्या आणि छोटे कारखाने आहेत. शिवाय येथे गॅरेजची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. छोट्या कारखान्यांसह येथील गॅरेजमधून अक्षरश: भंगार साहित्य मिठी नदीच्या पात्रात टाकले जात असून, हे सर्व खुलेआम सुरू आहे. त्यानंतर कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर पासून जरीमरीपर्यंतच्या मिठी नदीलगतच्या झोपड्यांमध्ये कारखान्यांचा समावेश असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा मिठी नदीत सोडला जात आहे.मिठी नदीचे क्षेत्र वगळता पूर्व उपनगरातील गोवंडी येथील रफीक नगर नाल्याची अवस्था तर दयनीय आहे. दोन आठवड्यांपूर्वी रफीक नगर नाला महापालिकेच्या वतीने साफ करण्यात आला होता. मात्र साफसफाई करून तीन दिवस उलटत नाहीत; तोवर हा नाला तरंगत्या कचऱ्याने भरला. आणि याच तरंगत्या कचऱ्याने महापालिकेच्या स्थायी समितीचे सभागृह तापले. मात्र मुळातच हा नालादेखील उर्वरित नाल्यांप्रमाणे झोपड्यांनी वेढलेला आहे. रफीक नगर नाल्याभोवती मोठ्या प्रमाणावर लघुद्योग आहेत आणि या लघुद्योगांतील प्लास्टिकचा कचरा येथील नाल्यांत टाकला जातो. नाल्यांतील गाळ कितीही काढला तरी प्लास्टिकसारखा कचरा नाल्यावर वारंवार तरंगताना दिसतो. (प्रतिनिधी)