एसआरए प्रकल्पात झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी विकता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:10 AM2021-03-13T04:10:02+5:302021-03-13T04:10:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसआरए प्रकल्पातील सदनिका पाच वर्षांनी विकण्याची मुभा देतानाच हा कालावधी झोपडी पाडल्यापासूनचा गृहीत धरावा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसआरए प्रकल्पातील सदनिका पाच वर्षांनी विकण्याची मुभा देतानाच हा कालावधी झोपडी पाडल्यापासूनचा गृहीत धरावा, यासाठी लवकरच नियमात बदल करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच, म्हाडा आणि एसआरएच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील किनाऱ्यालगतच्या झोपडपट्टयांच्या विकासाबाबत दीड महिन्यात धोरण तयार करणार असल्याचेही आव्हाडांनी सांगितले.
एसआरए प्रकल्पात इमारत उभी राहिल्यानंतर पाच वर्षांपर्यंत सदनिका विकता येत नाही. पण, अनेक प्रकल्प दहा - दहा वर्षे रखडतात. त्यामुळे झोपडपट्टीधारकांची अडचण होते. यावर उपाय म्हणून झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी सदनिका विकण्याची मुभा देण्याबाबतचा नियम बनविला जाईल. तसेच एसआरएमधील विकलेली घरे खाली करण्याची नोटीस विभागाने बजावल्या आहेत. त्यावर तोडगा काढून न्यायालयात भूमिका मांडण्यासाठी मंत्र्याची समिती बनविण्यात आली असून, यात संबंधित विषयावर चर्चा केली जाईल, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. याशिवाय, मुंबईत कुलाबाच्या बधवार पार्कपासून ते दहीसरपर्यंत किनारपट्टीवर ५५ झोपडपट्टया आहेत. एसआरए आणि म्हाडाच्या माध्यमातून इथे पुनर्विकास केल्यास परवानग्या लवकर मिळतील. शिवाय, या माध्यमातून शासनाला मोठा आर्थिक निधी मिळू शकतो, असेही आव्हाड म्हणाले.
बीडीडी चाळीचा पुनर्विकास शुभारंभ या महिन्यात होणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह, शरद पवार, आदित्य ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांच्या उपस्थितीत महिनाभरात भूमिपूजन होईल. तीन ते चार वर्षात बीडीडी चाळी उभ्या राहतील, असेही आव्हाड म्हणाले.
चौकट
पुण्यातील २६ म्हाडा इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. ५० - ६० वर्षांपूर्वीच्या या इमारती जीर्ण झाल्या असून, मोडकळीस आल्या आहेत. चटईक्षेत्र निर्देशांकाबाबत मुंबईला जे नियम आहेत तेच नियम या इमारतींना लागू करण्यात आले असून, त्यामुळे पुण्यात मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध होतील.