मुंबईतील हायब्रिड बस राहणार सुरू, एमएमआरडीए बेस्टला देणार थकीत रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 03:48 AM2018-12-25T03:48:43+5:302018-12-25T03:48:58+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) तगादा लावूनही थकीत रक्कम मिळत नसल्याने बेस्टने हायब्रिड बससेवा बंद करण्याची भूमिका घेतली होती.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) तगादा लावूनही थकीत रक्कम मिळत नसल्याने बेस्टने हायब्रिड बससेवा बंद करण्याची भूमिका घेतली होती. बेस्टच्या या भूमिकेनंतर एमएमआरडीएने बेस्टला थकीत सव्वादोन कोटी रुपये देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे बीकेसीमध्ये सुरू असलेली आणि चांगला प्रतिसाद मिळत असलेली हायब्रिड बससेवा यापुढेही सुरूच राहणार असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
बेस्ट आणि एमएमआरडीएमधल्या करारानुसार या सेवेसाठी एमएमआरडीएला बेस्टला सव्वादोन कोटी रुपये अदा करायचे आहेत. आधीच तोट्यात असलेल्या बेस्टला एमएमआरडीएकडून ही रक्कम मिळत नसल्याने बेस्टचे अधिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या बेस्टच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तत्काळ थकीत रक्कम न भरल्यास हायब्रिड बससेवा बंद करू, असा इशाराच या वेळी बेस्टकडून एमएमआरडीएला देण्यात आला.
बेस्टच्या इशाºयानंतर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असलेली हायब्रिड बससेवा बंद होईल या भीतीने आता एमएमआरडीए प्रशासनाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. बेस्टची थकीत सव्वादोन कोटी रुपयांची रक्कम देण्याच्या प्रकियेला सुरुवात केली असून ही रक्कम तत्काळ बेस्ट प्रशासनाकडे जमा करण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तर, एमएमआरडीएने थकीत रक्कम देण्याचे मान्य केले असून आम्हाला ही रक्कम लवकरच मिळेल, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिली आहे. एमएमआरडीए थकीत रक्कम भरणार असल्याने हायब्रिड बससेवेवर परिणाम होणार नाही.
अशी आहे हायब्रिड बससेवा
मार्च २०१८ मध्ये बीकेसीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएमआरडीएने इलेक्ट्रिकल हायब्रिड बस सेवा सुरू केली.
यासाठी एमएमआरडीएने तब्बल २५ हायब्रिड बससेवा खरेदी केल्या.
हा एमएमआरडीएचा प्रकल्प असला तरी या हायब्रिड बसचे व्यवस्थापन आणि देखभाल पूर्णत: बेस्टकडून केले जाते.
या बससाठी निधी देणे, बस खरेदी करून देण्याची जबाबदारी मात्र एमएमआरडीएवर आहे.
या बस वांद्रे स्थानक ते बीकेसी, बोरीवली ते बीकेसी आणि ठाणे ते बीकेसी या मार्गावर धावतात.
बस पूर्णत: वातानुकूलित असून बीकेसीत येणाºया नोकरदार वर्गासाठी उपयुक्त ठरत आहेत.