Hyderabad Encounter: हैदराबादचा न्याय; समर्थन... जल्लोष अन् विरोधही...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 03:32 AM2019-12-07T03:32:22+5:302019-12-07T03:32:34+5:30
हैदराबादमधील पोलिसांच्या एन्काउंटरचे देशभरातील सर्वसामान्यांकडून स्वागत होत असतानाच बुद्धिजीवी वर्गाकडून मात्र घडलेला प्रकार अयोग्य असल्याचे मत व्यक्त होत आहे. ...
हैदराबादमधील पोलिसांच्या एन्काउंटरचे देशभरातील सर्वसामान्यांकडून स्वागत होत असतानाच बुद्धिजीवी वर्गाकडून मात्र घडलेला प्रकार अयोग्य असल्याचे मत व्यक्त होत आहे. एन्काउंटरनंतर ‘मृत्यू’ हीच विकृतांसाठीची शिक्षा होती आणि ती पोलिसांनी दिली, याचा आनंद असल्याचे मत व्यक्त करीत अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे जोरदार समर्थन करण्यात आले; तर काही जणांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार देशात झालेल्या प्रत्येक एन्काउंटरची चौकशी व्हायलाच हवी, नाहक कुणाचाही जीव घेण्याचा अधिकार कायद्याने कोणालाही दिलेला नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त करीत पोलिसांच्या कारवाईला विरोध केला.
मुंबई : हैदराबाद येथील पशुवैद्यक महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येतील चारही आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाल्याची बातमी आली. सामान्य नागरिकांनी विशेषत: महिला वर्गाने पोलिसांच्या या कारवाईनंतर समाधान व्यक्त केले असले तरी महाराष्ट्रातील बहुतांश राजकीय नेत्यांची मात्र कोंडी झाली. जनभावनेसोबत जात या कारवाईचे स्वागत करावे की लोकशाही व्यवस्थेच्या नावाने विरोध करावा, अशा द्विधा मनस्थितीत बहुतांश नेते होते.
राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी न्याय झाला; परंतु ही पद्धत अन्यायकारक असल्याचे सांगितले. तर, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही चकमकीऐवजी या आरोपींना फासावर चढविले असते तर बरे झाले असते, असे मत व्यक्त केले. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही बलात्कारी आरोपींना अशीच शिक्षा व्हायला हवी, असे सांगताना यापुढे अशा प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी जलदगती न्यायालये स्थापन करावीत, असे सुचविले. भाजप नेत्या शायना एन.सी., काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मात्र नि:संदिग्धपणे हैदराबाद येथील पोलीस कारवाईचे समर्थन केले आहे.
वंचित बहुज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस कारवाईचा निषेध केला. न्यायालयांनी न्याय करणे अपेक्षित होते. पोलीसच न्याय करू लागले तर न्यायव्यवस्था संपेल. उद्या कोणीही कोणत्याही पोलिसाला सुपारी देईल आणि कोणालाही संपवेल याचा विचार व्यवस्थेने करायला हवा. पोलिसांनी न्यायालयाच्या भूमिकेत जाऊ नये, असे आंबेडकर म्हणाले.
हैदराबादच्या घटनेनंतर संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा केला जातो आहे, ही बाब अंतर्मुख होऊन विचार करण्याची आहे. पीडितेला न्याय दिला, असा हैदराबाद पोलिसांनी कुठेही दावा केला नाही; परंतु स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यात चार आरोपी ठार झाले. हा गोळीबार समर्थनीय होता किंवा नाही, हे न्यायालयीन चौकशीत स्पष्ट होईल; परंतु बलात्कारी आरोपी ठार झाले ही बातमी ऐकून जनतेत जी भावना पसरली आहे, ती गंभीरपणे विचार करण्यासारखी आहे. समाजात अशी भावना आता निर्माण झाली आहे की, कायदा अपंग आहे. कायद्याच्या प्रक्रियेनुसार गुन्हेगारांना लवकर शिक्षा होत नाही. म्हणून हा झटपट न्याय आहे. या भावना स्वाभाविक व नैसर्गिक असल्या तरी अशा भावनेतून भविष्यात अराजकता निर्माण होणार नाही हे कशावरून.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटनेची मुहूर्तमेढ रोवली त्यावेळी कायद्यानुसार स्थापित झालेले राज्य ही संकल्पना त्यांच्या मनात दृढ होती. गुन्हा सिद्ध करणे व शिक्षा देणे हे काम न्यायपालिकेचे आहे. त्या प्रक्रियेतूनच आरोपीला शिक्षा होऊ शकते; परंतु हल्ली न्यायपालिकेतून न्याय मिळण्याला बºयाच वर्षांचा वेळ जातो. ही बाब अत्यंत चिंतनीय आहे. त्यामुळे सरकार आणि न्यायपालिकेला स्त्रियांवरील अत्याचारांचे खटले निकाली कसे निघतील आणि गुन्हा सिद्ध झाल्यानंतर शिक्षेची अंमलबजावणी त्वरित कशी होईल, याचादेखील विचार करावा लागेल; अन्यथा पोलीस गोळीबारात आरोपींना ठार केले म्हणून जर कोणी चुकून पोलिसांना ‘हीरो’ मानू लागले, तर मात्र, गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले जाते, अशी टीका होईल. यामुळे भविष्यात अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल.
-अॅड. उज्ज्वल निकम, कायदेतज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील
आरोपी संशयित होते. त्यांचा गुन्हा सिद्ध होणे बाकी होते. पुरावे गोळा करणे अर्थात साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा गोळा करणे हे पोलिसांचे काम होते. घडलेल्या या गुन्ह्याच्या सर्व बाबी न्यायालयासमोर येणे अपेक्षित होते. मात्र, पोलीस त्यांना गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन गेले. तिथे नेमका काय प्रकार घडला, हे कोणालाही सांगता येणार नाही. पण न्यायालयासमोर आरोपींना हजर करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. अशाप्रकारे स्वत:च न्याय करणे हे पोलिसांचे काम नाही.
- रवींद्रनाथ आंग्रे,
एन्काउंटर स्पेशालिस्ट,
निवृत्त पोलीस निरीक्षक
हैदराबादमधील २६ वर्षीय डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळण्याचे घृणास्पद कृत्य करणाºया चारही आरोपींचे हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटर केले. मुळात आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा मिळायला हवी होती. एन्काउंटरनंतर सर्व स्तरांतून पोलिसांचे कौतुक केले जात आहे, परंतु या प्रकरणातील आरोपी हे खरे होते की नाही, हे न्याय्य पद्धतीने सिद्ध झाले नसल्याने याबाबत शंकेला जागा निर्माण होते. या एन्काउंटरमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरा प्रश्न हा आहे की, एन्काउंटर झाले की पोलिसांकडून ते घडविले गेले. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना असे एन्काउंटर होते, त्यावेळी पोलीस यंत्रणेवर शंका येते. ज्यांनी वेळीच कारवाई केली नाही, तक्रार नोंदवून घेतली नाही, अशा सर्वांवर कारवाई होऊ शकते. म्हणूनच यावर पडदा टाकण्यासाठी केलेला हा प्रयत्न असू शकतो. हे एन्काउंटर केले की घडविले, याची केंद्र सरकारने चौकशी करायला हवी. जे घडले, त्यावर पडदा टाकण्यासाठी हे केले गेले आहे का, हे तपासायला हवे.
- नीलम गोºहे,
शिवसेना नेत्या
एन्काउंटरनंतर संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीला तोंड द्यावे लागणार असले, तरी सध्याच्या घडीला वाढता आक्रोश या सर्वांना कारणीभूत ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी ७ वर्षे लागली. जलदगती न्यायालयात निकाल लागूनही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने त्या प्रक्रियेला दोन वर्षे लागणे ही खेदाची बाब आहे. संबंधित यंत्रणेत सुधारणा होणे गरजेचे आहे. त्यात नागरिकांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आपण २०२० या वर्षात प्रवेश करणार असताना, अशा प्रकारची घटना घडणे निंदनीय आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यात यंत्रणेवर वेळेचेही बंधन असणे आवश्यक आहे.
- पी. एस. पसरीचा, माजी पोलीस महासंचालक
निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. बलात्काºयाला फाशी झाली पाहिजे किंवा भरचौकात त्याचे लिंग कापले पाहिजे या समाजातून येणाºया प्रतिक्रिया नक्कीच रास्त आहेत. बलात्काºयाला गोळ्या घातल्या पाहिजे, हे म्हणणे सुद्धा पटण्याजोगे आहे. हैदराबादला जे एन्काऊंटर झाले याबद्दल अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्याबाबत येत्या काळात योग्य ती चौकशी होईलच. साक्षी-पुरावे गोळा केले जातीलच. इन्काउंटर खरे किंवा खोटे याबाबत न्यायालय निर्णय देईलच. न्यायालयाच्या निर्णयापूर्वी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. - प्रकाश साळसिंगीकर, विशेष सरकारी वकील
हैदराबादमधील बलात्कार आणि खून झालेल्या डॉक्टर युवतीला न्याय नक्कीच हवा होता, पण तो कायद्याच्या कक्षेत आणि गुन्हेगारी न्याय प्रणालीमधील निश्चित प्रक्रियेनुसार मिळायला हवा होता. त्यामुळेच या प्रकरणातील चार आरोपींचा पोलीस चकमकीत मृत्यू होण्याच्या घटनेबाबत संमिश्र भावना आहेत.आरोपी पोलीस चकमकीत मारले गेल्याने गुन्हेगारांना जरब बसेल. महिलांना उपभोग्य वस्तू समजणाºयांना कडक संदेश जाईल आणि त्याचबरोबर पीडित डॉक्टर युवतीला, तिच्या नातेवाइकांना न्याय मिळेल, असे वाटते, पण दुसरीकडे मात्र, आरोपींना शिक्षा कायद्याच्या चौकटीतच व्हायला हवी होती. कायदा कोणीही हाती घेता कामा नये.
- विजया रहाटकर, अध्यक्षा राज्य महिला आयोग
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा चकमकीतील मृत्यू बेकादेशीर वाटत असला, तरी अशा प्रकारची कारवाई काळाची गरजच होती. सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत कदाचित माझ्या भूमिकेशी सहमत नसतील, परंतु अशा प्रकारे एखादा कठोर संदेश, उदाहरण समाजासमोर ठेवणे आवश्यक होते. या घटनेमुळे देशातील महिलांच्या मनात एकप्रकारे सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. त्याबद्दल हैदराबाद पोलिसांचे अभिनंदनच करायला हवे.
- संजय निरूपम, काँग्रेस नेते
जे झाले ते योग्यच झाले. असे गुन्हेगार पोलिसांवर दगडफेक करीत असतील व त्यांची हत्यारे हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करीत असतील तर त्यांच्याकडून एखादा पोलीस मारला जाण्याची वाट पाहणे हेही संयुक्तिक नाही.
- दत्ता घुले, निवृत्त पोलीस निरीक्षक, एन्काऊंटर स्पेशालिस्ट