मुंबई - हैदराबाद येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना सकाळी घडली. यामध्ये गुन्ह्यातील चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
एबीपीशी माझाशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हैदराबादमध्ये ज्यांनी एन्काऊंटर केलं आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. कायद्याची प्रक्रिया आहे ती ओलांडता येत नाही. झटपट न्याय देण्याची प्रथा पोलिसांनी सुरु केली आहे. त्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. आरोपीला अशाप्रकारे संपविता येत नाही, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करुन महिना-दोन महिन्यात हे प्रकरण संपवता आलं असतं असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
तर एन्काऊंटरमुळे फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, पोलिसांच्या ताब्यात असताना असं एन्काऊंटर होतं त्यावेळी पोलीस यंत्रणेबद्दल शंका येते, यातील मुख्य सूत्रधार समोर येत नाही, एन्काऊंटर केले की घडवले याची चौकशी करावी. सीआयडी अथवा सीबीआय चौकशी झाली पाहिजे. अशामार्गाने पुरावे नष्ट केले जातात. चौकशी होत नाही. आरोपी खरे होते की नाही येथून ही सुरुवात होते. घडलेल्या घटनांवर पडदा पडावा यासाठी पोलीस काही लोकांना अटक करतात. जर ते खरोच आरोपी होते तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली असती, पण या घटनेची चौकशी व्हायला हवी अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
तसेच हैदराबाद प्रकरणात पोलिसांनी आरोपींचा खात्मा केला ते योग्यच आहे, शस्त्र हिरावून पळण्याचं धाडस करणाऱ्यांचा खात्मा झाला. या प्रकरणात सुनावणी सुरु होती. न्यायिक प्रक्रिया सुरु होती असं मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी मांडले आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाला हदरवून टाकणारं हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा पोलिसांनी केला आहे. ज्या ठिकाणी आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचठिकाणी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलीस तपासावेळी हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही घटना घडली. तेलंगणा पोलिसांकडून या ४ आरोपींना घटनास्थळावर तपासासाठी नेलं होतं. त्यावेळी घटनेचा रिक्रिएशन समजून घेताना त्यातील आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी गोळीबार करत या आरोपींचा एन्काऊंटर केला आहे.