मुंबई : डिजिटल पायरसीद्वारे आर्थिक फसवणूक करणाऱ्या व अँड्रॉईड अप्लिकेशनचा वापर करून बेकायदेशीरपणे ग्राहकांना ‘प्रीमियम कन्टेन्ट’ उपलब्ध करून देणाऱ्या हैदराबाद येथील एका तरुणाला अटक केली आहे. सतीश श्रीरामदास वेंकटेश्वरलु, (वय २८ रा. वनास्थलीपुरम स्वामी नारायण नगर, गुरराम गडा) असे त्याचे नाव आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
वायकॉम १८ मीडिया व स्वतःचे सॅटेलाईट चॅनेल्स व ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्याचे सतीशने एक मोबाईल स्टॅन्डअलोन पायरेट अप्लिकेशन, ‘थोप टीव्ही’ या नावाने बनविले होते. कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करीत कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्याने ते युजर्सना स्वस्त दरात, चित्रपट, टीव्ही शो, वेब-मालिका अवैधरीत्या प्रसारण व पुनःप्रक्षेपण उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे या मीडिया कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, तक्रार नोंदविल्यानंतर लगेचच महाराष्ट्र सायबरच्या संशोधन व विश्लेषण पथकाने, तांत्रिक मार्गाने तातडीने तपास करून सतीश वेंकटेश्वरलु याला अटक केली.