१३,५०० मेगावॅटची जलविद्युत निर्मिती; ७१ हजार कोटी रुपयांचे करार: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 08:26 AM2023-06-07T08:26:38+5:302023-06-07T08:27:10+5:30
या प्रकल्पांमुळे ३० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील धरणांवर ७१ हजार कोटी रुपये खर्चून १३ हजार ५०० मेगावॅट जलविद्युत निर्माण करण्यासाठी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करार करण्यात आले. या प्रकल्पांमुळे ३० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर हे करार करण्यात आले. त्यात नॅशनल हायड्रो पॉवर काॅर्पोरेशनच्या माध्यमातून ४४ हजार कोटी रुपयांचे ७,३५० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. टोरंट पॉवर लि. कंपनीच्या माध्यमातून ५,७०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प २७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह उभारण्यात येणार आहेत. नॅशनल हायड्रोचे प्रकल्प सावित्री (२२५० मेगावॅट), काळू (११५० मेगावॅट), केंगाडी (११५० मेगावॅट), जालोंद (२४०० मेगावॅट) तर टोरंटचे कर्जत (३००० मेगावॅट), मावळ (१२०० मेगावॅट), जुन्नर (१५०० मेगावॅट) येथे प्रकल्प असतील.
खालच्या जलाशयातून पाणी सौर ऊर्जेतून उचलले जाते. रात्रीच्या वेळी तेच पाणी खालच्या स्तरामध्ये आणले जाते आणि यातून पंपिंग मोडद्वारे वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात येते. अपांरपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात हे करार असून एवढी गुंतवणूक अन्य कुठल्याही राज्यात आलेली नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
पूर्वीचे सरकार स्वत:च्या घरी होते
राज्यात आमचे सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक उपाययोजना राबवीत असून, आम्ही ‘सरकार आपल्या दारी’सारखे उपक्रम राबवीत आहोत, तर पूर्वीच्या सरकारचा ‘सरकार स्वत:च्या घरी’ असा कारभार होता, असा टोलाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.