Coronavirus: कोरोनामुळे 'हायजेनिक' रक्तदान शिबिर; लालबागच्या राजा मंडळाचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 03:16 PM2020-03-23T15:16:07+5:302020-03-23T15:16:59+5:30
१ एप्रिलपर्यंत सकाळी ९ ते ५ या कालावधीत हे शिबिर चालणार आहे.
मुंबई : लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आजपासून हायजेनिक रक्तदान शिबिराला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान केले जात आहे. १ एप्रिलपर्यंत सकाळी ९ ते ५ या कालावधीत हे शिबिर चालणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत लालबाग राजा मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत अनोख्या रक्तदान शिबिराला सुरूवात केली आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजता शिबिराला सुरुवात झाली. 1 एप्रिलपर्यंत रोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत हे रक्तदान शिबीर चालू राहणार आहे. लालबागचा राजा योग केंद्रात या शिबिराच आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली आहे.
राज्याच्या रक्त संक्रमण परिषदेच्या मान्यतेने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवसांच्या या शिबिरात रक्तदात्यांची अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले जाणार आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेतली जात आहे. दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात येत आहे. शिवाय, स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे मंडळाचे सुधीर साळवी यांनी सांगितले.
राज्यात दररोज साधारण पाच हजार रूग्णांना रक्ताची आवश्यकता असते. विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. शिवाय, उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यात अवघ्या १५-२० दिवसांचाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. शिवाय, छोट्या स्तरावर रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवाहनही केले.
चौकट
राजेश टोपे यांनी केले मंडळाचे कौतुक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी कमी कालावधीत लालबागच्या राजा मंडळाने हायजेनिक रक्तदान शिबिराचे आयोजन केल्या बद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंडळाचे विशेष कौतुक केले. स्वतः या शिबिराला भेट देत पाहणी केली. सोशल डिस्टंसिंग सह अन्य उपाययोनांचेही त्यांनी कौतुक केले.