मतदारांना आकर्षित करण्यासाठी उधळण; उत्सवांना इव्हेंटचे स्वरूप, हळदी-कुंकू समारंभासाठी महागडे वाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 01:23 PM2023-10-22T13:23:17+5:302023-10-22T13:24:04+5:30
या इव्हेंटमधील वाण देण्याच्या संस्कृतीला राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाल्याने याची उलाढालही लाखोंमध्ये असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मागील काही वर्षांत शहर उपनगरातील सार्वजनिक सण-उत्सवांचे स्वरूप बदलले आहे. आता या उत्सवांना इव्हेंटचे स्वरूप आले आहे. प्रत्येक कार्यक्रम वा स्पर्धा, परंपरांनी कात टाकली आहे. याचाच भाग असणारा नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सवातील हळदी-कुंकू समारंभही आता ग्लॅमरस झाला आहे. या इव्हेंटमधील वाण देण्याच्या संस्कृतीला राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाल्याने याची उलाढालही लाखोंमध्ये असल्याचे दिसून येते.
आठवडाभर साजरा होणाऱ्या या उत्सवात स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी, निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार यांच्याकडून लाखोंचा खर्च केला जातो. शिवाय, महिला वर्गाचे मन जिंकण्यासाठी वाण देण्याच्या पद्धतीने इको फ्रेंडली व महागड्या वस्तूंची जागा घेतली आहे. यात मग रोप, कुंडी, विविध वनस्पतींच्या बिया, कापडी पिशव्या, कागदी लगद्याच्या वस्तू, दागिने, कापडी पर्स, पॉट, मूर्ती, तोरण अशा वस्तूंची देवाण-घेवाण हा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
डबे, हातरुमाल आता मागे पडले!
पूर्वी गणेशोत्सव वा नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित हळदी-कुंकू समारंभात आरसा, टिकल्यांची पाकिटे, प्लास्टिक वा स्टीलचे छोटे डबे, बाटल्या, हातरूमाल असे वाण दिले जायचे. या समारंभांमध्ये केवळ महिलांना एकत्र करणे, त्यांनी एकत्र येत कलागुणांचे सादरीकरण अशी संकल्पना होती. मात्र, आता हे स्वरूप बदलले आहे. आता इव्हेंटचे स्वरूप आले आहे.
स्पर्धेही बक्षिसांची लूट
तरुणी, महिलावर्ग हा मतदार डोळ्यांसमोर ठेवून सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून होम मिनिस्टर, पाककृती स्पर्धा, फॅशन शो, नृत्यकला अशा स्पर्धांचे आयोजन व्हायचे. या माध्यमातूनही साड्या, डिनर सेट, ड्रेस मटेरिअल, किचन किट वा मेकअप किट अशा महागड्या बक्षिसांची खैरात असते.
महिला मतदार ‘साॅफ्ट टार्गेट’
महिलावर्गाला भुरळ घालणे अत्यंत सोपे असते, असा समज आहे. याच धर्तीवर साड्या, गृहोपयोगी वस्तू, इको फ्रेंडली वस्तूंचे वाण दिल्याने महिला लगेचच खुश होतात. मागील काही वर्षांत आलेले ग्लॅमर पाहता त्यात नृत्य, संगीत कला सादर करणे, खाद्यपदार्थांची रेलचेल, फोटो काढणे, व्हिडीओ बनविणे या विविध कार्यक्रमांमुळे महिला मतदार खूश होऊन याचा आनंद लुटताना दिसतात.
अनेकदा राजकीय स्थानिक नेते, प्रतिनिधींकडून उत्सव काळातील अशा समारंभासाठी एक ठरावीक कंत्राटदार, बचत गट वा घाऊक विक्रेत्यांची निवड करण्यात येते. या ठरलेल्या घटकांकडून उत्सव काळातील कार्यक्रमांसाठी बल्क ऑर्डर देत वस्तूंची खरेदी करण्यात येते, शिवाय सण-उत्सवाप्रमाणे या वस्तू ठरलेल्या घटकांकडून कस्टमाइज्ड्ही करण्याची मुभा असते. - रामलाल जेठिया, घाऊक विक्रेते, क्राॅफर्ड मार्केट.