Join us

हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच

By admin | Published: March 22, 2015 1:30 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ हजार पेटी आंब्याची आवक झाली. अवकाळी पाऊस व रोगराईमुळे पिकावर परिणाम झाला असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाली आहे.

नवी मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ हजार पेटी आंब्याची आवक झाली. अवकाळी पाऊस व रोगराईमुळे पिकावर परिणाम झाला असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाली आहे. त्यामुळे या वर्षी हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एपीएमसी मार्केटमध्ये २०० ते ९०० रुपये डझन दराने आंबा विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ४०० ते १८०० रुपये डझन एवढे आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फेब्रुवारीपासून आंब्याची आवक होते. परंतु गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दर वर्षी चांगली आवक सुरू होते. या काळात आंब्याचे दर कमी होत असल्यामुळे सर्वसाधारण ग्राहकही पाडव्यापासून आंबा खरेदी करतात. या मुहूर्ताला मार्केटमध्ये विशेष महत्त्व असते. मागील काही दिवसांपासून कोकण व दक्षिणेतील राज्यातून २० ते २४ हजार पेट्यांची आवक सुरू आहे. गुढीपाडव्याला आवक वाढेल अशी अपेक्षा होती. परंतु दिवसभरामध्ये २५ हजार पेट्यांची आवक झाली. गतवर्षी पाडव्याला ५० हजारपेक्षा जास्त पेट्या बाजारात दाखल झाल्या होत्या. यावर्षी अवकाळी पाऊस व पिकावर पडलेल्या रोगामुळे आंब्याचे पीक कमी होऊन डागही पडले आहेत. एपीएमसीमधील व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे यांनी सांगितले की, कोकणासह दक्षिणेतील राज्यातून आंब्याची आवक होत आहे. त्यामुळे बाजारभाव तेजीत आहेत. भावात खूप घट होण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. च्रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातून हापूसची आवक होत आहे. या व्यतिरिक्त आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळमधून बदामी, लालबाग, पियू, गोळा, तोतापुरी, हापूस या आंब्याची आवक सुरू आहे. रोज सरासरी २० ते २५ हजार पेट्यांची आवक सुरू आहे.