पुण्यात 'हुंडाई'चा प्रकल्प, ७००० कोटींची गुंतवणूक, कंपनीच्या MD ची फडणवीसांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 08:35 PM2024-01-13T20:35:11+5:302024-01-13T21:01:09+5:30

या भेटीतील चर्चेदरम्यान, हुंडाईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुण्यातील प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध पैलूंवर सल्ला आणि सहाय्य देखील मागितले.

'Hyundai' project in Pune, investment of 7000 crores, MD meets Devendra Fadnavis in mumbai | पुण्यात 'हुंडाई'चा प्रकल्प, ७००० कोटींची गुंतवणूक, कंपनीच्या MD ची फडणवीसांशी चर्चा

पुण्यात 'हुंडाई'चा प्रकल्प, ७००० कोटींची गुंतवणूक, कंपनीच्या MD ची फडणवीसांशी चर्चा

मुंबई - पुण्यात होत असलेला वेंदात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. विशेष म्हणजे विद्यमान सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तेव्हा विरोधी पक्षात असल्याने महायुती सरकारवर टीका केली होती. त्यानंतरही काही प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, अशाचत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुंडाई कंपनी पुण्यात ७००० कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याची माहिती दिली. 

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हुंडाई कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, या फोटोंसह त्यांनी हुंडाई कंपनीकडून पुण्यात तब्बल ७००० कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचे म्हटले. 

''Hyundai Motor India (HMI) चे MD आणि CEO किम उनसू यांच्यासह कंपनीचे कार्यकारी संचालक J.W Ryu व कंपनीच्या इतर वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटून आनंद झाला. त्यांनी मला हुंडाई मोटार इंडियाच्या माध्यमातून पुण्यातील तळेगाव येथे ७००० कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची माहिती दिली.'', असे ट्विट फडणवीसांनी केले आहे. 

या भेटीतील चर्चेदरम्यान, हुंडाईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुण्यातील प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध पैलूंवर सल्ला आणि सहाय्य देखील मागितले. संबंधित प्रकल्पाची सुयोग्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आमच्या सरकारच्यावतीने संपूर्ण सहकार्य व पाठिंबा देण्याचे आश्वासन दिल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. हुंडाईची गेल्या २५ वर्षांपासून तामिळनाडूत मोठी गुंतवणूक आणि उद्योग आहे. मात्र, तामिळनाडूबाहेरील ही त्यांची पहिलीच गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रातील पुण्यात होत आहे. पुण्यातील या प्रकल्पासंदर्भाने महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार करण्यासाठी ते पुढील आठवड्यात दावोसला भेट देत आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र होत असलेल्या हुंडाईच्या या प्रकल्पाचा आम्हाला आनंद असून त्यांनी वर्ल्ड क्लास ऑटोमोबाईल हब उभारावे, यासाठी त्यांचं स्वागत करतो, असेही फडणवीसांनी म्हटले. 

दरम्यान, पुण्यात मोठं ऑटोमोबाईल हब असून टाटाचे अनेक प्रकल्प आहेत. त्यातच, आता हुंडाईचा प्रकल्प उभारण्यात येत असल्याने पुण्यात आणखी रोजगार निर्माण होईल. 
 

Web Title: 'Hyundai' project in Pune, investment of 7000 crores, MD meets Devendra Fadnavis in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.