Mahavikas Aghadi Meeting ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीकोनातून मुंबईतील फोर सीझन्स हॉटेल इथं महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर काही नेते उपस्थित होते. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीतही जागावाटपावर अंतिम तोडगा काढण्यात अपयश आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला उपस्थित असणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी या बैठकीचा तपशील सोशल मीडियावर उघड केला आहे.
मविआच्या बैठकीविषयी माहिती देताना सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं आहे की, "जे मुद्दे काही दिवसांपासून अचर्चित आहेत, ते मुद्दे आजच्या बैठकीत आम्ही चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आजच्याही बैठकीत या मुद्द्यांबाबत चर्चा होऊ शकली नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत आज चर्चा झाली नाही. तसंच आम्ही मागच्या बैठकीत दिलेल्या अजेंड्यांवरही चर्चा झाली नाही. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी १५ जागांवर ओबीसी उमेदवार देणे, मुस्लीम समाजातून ३ उमेदवार देणे, तसंच महाविकास आघाडीतील कोणताही घटकपक्ष निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही, याबाबतचे लेखी आश्वासन देणे, या मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र तसं काही झालं नाही," अशा शब्दांत सिद्धार्थ मोकळे यांनी आपली निराशा व्यक्त केली.
प्रकाश आंबेडकरांकडून थेट अकोल्याची जागा सोडण्याचा प्रस्ताव
मविआच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघत नसल्याने एका टप्प्यावर तर प्रकाश आंबेडकर यांनी आपण अकोल्याचीही जागा सोडायला तयार असल्याचं म्हटलं, असा दावा सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे. "एका टप्प्यानंतर चर्चा थांबली होती. त्यानंतर जेवणासाठी ब्रेक घेण्यात आला. जेवताना प्रकाश आंबेडकरांनी एक वाक्य वापरलं, जे माझ्या मनाला लागलं. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी आघाडीसोबत आहे, पण मला असं वाटतंय की आघाडीच माझ्यासोबत नाही. ही आघाडी होऊन ती शेवटपर्यंत टिकावी आणि भाजपचा पराभव करावा, अशी माझी इच्छा आहे. हवं तर मी माझी अकोल्याची जागाही सोडतो, पण तुम्ही काहीतरी बोला आणि तोडगा काढा, असं या बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं," असं सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, "पहिल्या बैठकीपासून वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी विचारत आहेत की तुम्ही आम्हाला किती आणि कोणत्या जागा देणार आहात, ते सांगा. मात्र आजच्या बैठकीपर्यंत याबाबत आम्हाला कळवण्यात आलेलं नाही. आता जागांवर चर्चा करण्यासाठी आणखी वेळ वाढवून मागण्यात आला आहे आणि आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू आणि चर्चा करू असं आम्हाला कळवण्यात आलं आहे. त्या बैठकीत काही वेगळं चित्र दिसेल, अशी अपेक्षा आम्हाला आहे," असंही सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्ट केलं आहे.