Join us

'मीही अमित शाह यांना शुभेच्छा देते'; मिलिंद नार्वेकरांच्या चर्चेवर किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 3:14 PM

नार्वेकरांनी थेट भाजपश्रेष्ठींना केलेल्या एका ट्विटची चर्चा रंगली आहे. 

मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अपेक्स काऊन्सिलच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी विजय मिळवला. मैदान मारुन काही तास उलटत नाहीत, तोच नार्वेकरांनी थेट भाजपश्रेष्ठींना केलेल्या एका ट्विटची चर्चा रंगली आहे. 

मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विट केले असून, यानिमित्ताने पुन्हा एका चर्चांना उधाण आले आहे. यावर आता मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मिलिंद नार्वेकर यांची ही कृती बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कृतीतूनच झाली आहे. शुभेच्छा देणं ही आपली राजकीय संस्कृती आहे. मी सुद्धा अमित शाह यांना शुभेच्छा देते, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. शिंदे गटाला आता काही काम राहिलेलं नाही, त्यामुळे हा नाराज, तो महाराज…अशा अफवा ते पसरवत असतात, अशी टीकाही किशोरी पेडणेकरांनी केली आहे.

दरम्यान, मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचे मी ऐकतोय. नार्वेकर यांचे अमित भाईंशी संबंध चांगले आहेत. मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज आहेत. शिवसेनेत कोण राहील आणि कोण जाईल हे सांगता येत नाही, असे सूचक विधान गिरीश महाजन यांनी केले आहे.  राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते. मुंबई महापालिकेत भाजची सत्ता येणार आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र महापालिका लढणार आहे. मात्र मनसेबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अमित शाहमिलिंद नार्वेकरशिवसेनाकिशोरी पेडणेकर