मुंबई- राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. शिवसेन पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून उडी मारू, असं म्हणणारे शिवसेनेचे एक कट्टर आमदार मंत्री संदीपान भुमरे देखील मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.
संदीपान भुमरे यांचं हे विधान सोमवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झालं. यानंतर आज त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. होय...मी उद्धव ठाकरे बोलतील तर ७व्या मजल्यावरुन उडी मारु असं बोललो होतो. मात्र सत्ता आल्यावर कामं तरी झाली पाहिजे. आम्ही वारंवार उद्धव ठाकरे यांना सांगितलं, की कामं होते असताना अडचणी येत आहेत. मी आता सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून कामे होत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत कामं करताना अडचणी येतात, अशी नाराजी संदीपान भुमरे व्यक्त केली.
संदीपान भुमरे पुढे म्हणाले की, आता आम्ही एकनाथ शिंदे यांचं नेतृ्त्व मान्य केलं आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. एकनाथ शिंदेंसोबत ६ मंत्री आहेत. आम्ही पक्ष बदलणार नाही. एकनाथ शिंदेंसोबत राहणार. बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत. आम्ही शिवसेनेत राहणार, पण वेगळा गट राहणार, असं मंत्री संदीपान भुमरे म्हणाले.
दरम्यान, सन २०१९ च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप-शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरु होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यांनतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी बोलताना शिवसेना आमदार भुमरे म्हणाले होते की, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. उद्धव ठाकरेंनी जर आम्हाला सातव्या मजल्यावरून उडी मारण्याचे आदेश दिले तर, ते ही करू, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिकिया दिली होती.
सर्व आमदार स्वखुशीनं इथं आहेत- राज्यमंत्री बच्चू कडू
आमदारांना मारहाण करुन डांबून ठेवण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इथं असं अजिबात काहीच झालेलं नाही असं म्हटलं. "सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे", असं बच्चू कडू म्हणाले.