"मी मराठा, देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी देवमाणूस"; सभागृहात राम कदम कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 03:52 PM2024-02-29T15:52:45+5:302024-02-29T15:54:51+5:30
फडणवीस यांच्या बाजूने भूमिका मांडताना विधानसभेत आमदार राम कदम यांनीही मी मराठा आहे, असा उल्लेख केला.
मुंबई - उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा बाळगली. त्यानंतर, मराठा समाजातील काही आमदार नेते यांनी मनोज जरांगे यांच्या भाषेवरुन त्यांच्यावर टीका केली. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी खूप काही केलंय. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं कामही देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचं आमदारांनी सांगितलं. फडणवीस यांच्या बाजूने भूमिका मांडताना विधानसभेत आमदार राम कदम यांनीही मी मराठा आहे, असा उल्लेख केला.
विधानसभेच्या कामकाजाला आज सुरुवात झाल्यानंतर सभागृहात पाँईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत भाजपा आमदार राम कदम यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात जातीवाद कसा पसरेल याचं मोठं षडयंत्र व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. देवेंद्र फडणवीसांना या मातीत गाडणार असं त्यातला इसम बोलतो, देवेंद्र फडणवीसांसारखं महाराष्ट्रातले ब्राह्मण ३ मिनिटांत संपवून टाकू असं बोलतो. याबाबत सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. त्यात ज्याला पकडण्यात आले. त्याला सोडवण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केला. रोहित पवार आणि या व्यक्तीचा काय संबंध असा सवाल कदम यांनी उपस्थित केला. यावेळी, देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन करताना मीही मराठा आहे, असे राम कदम यांनी म्हटले.
अध्यक्ष महोदय मी स्वत: मराठा आहे, मराठ्यांची जेवढी आंदोलने झाली. जेवढ मोर्चे निघाले ते शांततेत निघाले, असे राम कदम म्हणत असताना वेळ संपल्याची बेल वाजली. त्यावेळी, देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देवमाणूस आहे, देवेंद्र फडणवीसांबद्दल कोण असं बोलणार असेल तर ते सहन करणार नाही, असेही राम कदम यांनी थेट सभागृहात म्हटले. योगेश सावंत नावाची ही व्यक्ती असून रोहित पवार यांनी त्याला सोडविण्यासाठी फोन केला होता, असेही कदम यांनी म्हटले.
रोहित पवारांनी पोलिसांना फोन करुन संबंधित व्यक्तीला सोडून देण्याची मागणी केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा जो नेता आहे, योगेश सावंत तो महाराष्ट्रात जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करतो. जो मराठा समाज शांततेत मोर्चे काढत होता, जो शांततेत आंदोलन करत होता, त्या मराठा समाजाला तुम्ही बदनाम करायचं काम करता, असे म्हणत आमदार रोहित पवार यांच्यावर राम कदम यांनी टीका केली.
विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश
मनोज जरांगेंच्या आंदोलनास आम्ही पहिल्या दिवसापासून समर्थन दिलंय. पण, मराठा आरक्षण मिळाल्यानंतर कसलं आंदोलन?, ती शरद पवारांची स्क्रीप्ट आहे. रोहित पवारांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. शरद पवार यांच्या गटाचा त्या व्हिडिओशी काय संबंध आहे. जातीजातीत भांडणं लावायची रोहित पवारांची इच्छा आहे का, असा सवालही राम कदम यांनी उपस्थित केला. तसेच, विधानसभा अध्यक्षांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत, असेही कदम यांनी म्हटले.