मुंबई - शिवाजी पार्क मैदानावर आज मनसेचा १७ वा गुढी पाडवा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह असून शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजीही करण्यात आलीये. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिवसेना भवनासमोरच हे बॅनर लावून मनसेने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. एकीकडे मनसेप्रमुख राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना नाराजी व्यक्त केली होती. राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय, अशा शब्दात त्यांनी मत व्यक्त केलं होतं. आता, त्याच राज ठाकरेंनी सध्याच्या राजकारणात आपण फीट बसत नसल्याचं म्हटलंय.
'आताचे महाराष्ट्राचे राजकारण बघता, त्यात मी मिस फिट आहे. असे वाटते. आजच्यासारखी महाराष्ट्राची परिस्थिती मी कधीच पाहिली नाही. त्यामुळे या सगळ्याचा वीट आला आहे. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले, त्यावर ही वेळ आली आहे. राज्यात २० वर्षांपूर्वी निकोप राजकारण होते. आता जे सुरु आहे ते वाईट आहे, अशी उद्गविग्न प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केलीय. लोकमान्य सेवा संघातर्फे शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित 'कलात्मक मनाचे कवडसे या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अंबरिष मिश्र यांनी घेतली. त्यामध्ये, राज यांनी सध्याचं राजकारण ते कला क्षेत्रापर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. सध्याच्या राजकारणातून सुशिक्षित आणि चळवळीतला वर्ग बाहेर पडला आहे. मात्र, राज यांनी तरुणाईला राजकारणात येण्याचे आवाहनही या मुलीखतीच्या माध्यमातून केलंय.
तरुणांनो राजकारणात या
देशातील सुशिक्षित मध्यमवर्ग राजकारणातून बाहेर पडला. हा वर्ग भारताबाहेर गेला. या मध्यमवर्गाने पुन्हा माघारी यायला हवे. त्यांनी येथील राजकारण, समाजकारण हातात घ्यायला हवे. अन्यथा महाराष्ट्रातील राजकारणाची परिस्थिती उत्तर प्रदेश, बिहारसारखी होईल', असेही ठाकरे यांनी म्हटले. 'राजकारणानेच सर्व गोष्टी ठरतात. त्यामुळे मध्यमवर्गाने राजकारणात यायला हवे. केवळ माझ्याच पक्षात या असं मी म्हणणार नाही, तुम्हाला आवडेल त्या पक्षात जावा, पण राजकारणात या, असे आवाहन राज यांनी राज्यातील तरुणाईला केले आहे.