गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, सुषमा अंधारे यादेखील सातत्यानं अनेकांवर टीकेचा बाण सोडत आहेत. अशातच सुषमा अंधारे अधिक सक्रिय झाल्यामुळे दिपाली सय्यद या ठाकरे गटाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यावर खुद्द सुषमा अंधारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
"तुम्ही काहीतरी उगाच कंड्या पिकवू नका. जेव्हा दोन तीन माध्यमांना बातमी लागली तेव्हा दिपाली ताईंचा मला फोन आला. हे लोक वेगळा अर्थ काढतायत असं त्या म्हणाल्या होत्या. आमच्यात भांडणं लावण्याचे प्रयत्न करू नका," असं अंधारे म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी दिपाली सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. परंतु त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला होता. इतकंच काय तर शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याबद्दलही त्यांनी वक्तव्य केलं होतं. एकनाथ शिंदे यांची भेट घेतलही त्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं.