मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यांनी तुरुंगातून सुटका होताच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. तसेच 'हम है हिंदुस्थानी' असं म्हणत ही आपली ताकद असल्याचं म्हटलं. यावेळी सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी त्यांना घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलबाहेर आले होते.
भारताच्या संविधानापेक्षा मोठा कोणी नाही. यापुढे आमचा केंद्रबिंदू असेल भ्रष्टाचार. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू, असं सदावर्ते म्हणाले. कष्टकरी चळवळीला मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नका. असे गुन्हे दाखल केल्यानंतर शिखर निघत नसतं हे लक्षात राहू द्या, असं मी महाराष्ट्राच्या सरकारला आदरपूर्वक सांगतो, असं सदावर्तेंनी सांगितले.
माझा कैदीनंबर ५६८१ होता. कष्टकऱ्यांसाठी लढणारा मी कैदी आहे, असं सदावर्ते म्हणाले. तसेच सरकारला जे काय करायचं ते करू द्या आपण आपलं तत्व सोडायचं नाही असं मी ठरवलं होतं. जेलमध्ये गेल्यापासून आजपर्यंत मी फक्त पाणी प्राशण केलं आहे, असे सदावर्ते यांनी सांगितले.
आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मी विनंती करतो की माझी हत्या झाली, तर आपण योग्य ती पावलं उचलावी. ते घडण्याआधीही योग्य ती पावलं उचलावी, अशी विनंती सदावर्ते यांनी केली.
दरम्यान, एसटी महामंडळातील कष्टकरी जे कामावर गेलेत ते काही कोणाच्या सांगण्यावरून गेले नाहीत. मी स्वत: जेलमधून सांगितलं होतं, तूर्त कष्टकरी कर्मचाऱ्यांनी कामावर जावं. कारण माझे कष्टकरी ६ महिने दुखवट्यात होते. मी त्यांचं कोणतंही नुकसान होऊ दिलं नाही, असंही सदावर्ते यांनी सांगितलं.