Join us  

मी कट्टर हिंदू, वसुधैव कुटुंबकम मानणारा, मला...; जितेंद्र आव्हाडांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 6:42 PM

मी जन्मापासून हिंदू आहे आणि मृत्यूही हिंदू म्हणूनच होणार आहे असं त्यांनी सांगितले. 

मुंबई - रामनवमी, हनुमानजयंती हे उत्सव दंगलीसाठीच आहेत असं वातावरण केले जाते. यातून जगभरात बदनाम कोण होतंय?. हिंदू बदनाम होतोय. मी हिंदू आहे, कट्टर हिंदू. वसुधैव कुटुंबकम मानणारा आहे. मला दंगली आवडत नाही. कारण राम बापाचं ऐकणारा होता, आईचं ऐकणारा होता, भावाला सन्मानित करणारा होता तो राम आम्ही जाणतो, समाजात एकता, प्रेम, बंधुत्व पसरवतो अशा शब्दात राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांनीभाजपाच्या आरोपावर खुलासा केला आहे. रामनवमी, हनुमानजयंती उत्सवाबाबत केलेल्या विधानावरून झालेल्या वादावर आव्हाडांनी स्पष्टीकरण दिले. 

जितेंद्र आव्हाडांचे 'ते' विधान रामभक्तांचा अपमान करणारं; देवेंद्र फडणवीस संतापले

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राम द्वेष पसरवत नाही. समाजाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा. समाजात विष पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याने देशाचे नुकसान होणार आहे. मला भाजपाकडून हिंदू प्रमाणपत्र नको. ज्या आईच्या पोटातून मी जन्म घेतला, त्या आईबापाने मला प्रमाणपत्र दिले आहे. मी जन्मापासून हिंदू आहे आणि मृत्यूही हिंदू म्हणूनच होणार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच सध्या जे वातावरण दिसते ते याआधी दिसत नव्हते. मागील रामनवमी, हनुमानजयंती पाहा, कधी दहशतीचं वातावरण नव्हते. मग यंदा असं का झाले? हा प्रश्न विचारायला नको का? समाजात जे पुढे घडणार आहे त्याबद्दल समाजाला अलर्ट करणे ही माझी जबाबदारी आहे. मागच्या रमजानवेळी भोंग्यामुळे संपूर्ण वातावरण बिघडले होते. असं घडत असेल तर ते बोलायले हवे. वातावरण खराब होतंय. समाजात एकता ठेवण्यासाठी बोलायला हवं. प्रत्येकाने मौन बाळगले तर दुसऱ्याच्या मृत्यूनंतर विचार होणार का? असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी केला. 

दरम्यान, या जगात मृत्यूपेक्षा जास्त किंमत आहे का? ज्या चुका आहेत त्या दाखवायच्या. बोलल्याशिवाय महाराष्ट्राला कळणार कसं? मला २ दिवस जेलमध्ये बसवतील अजून काय होईल. रामनवमी, हनुमानजयंती पूर्वी ज्यारितीने केली जायची ते आम्ही घरात अनुभवलंय. देशाचे चित्र पाहा, काय घडतेय ते पाहा. त्यावरून पुढे काय होईल याचा अंदाज लावा. मी जे काही बोललो ते रेकॉर्डवर आहे. आजही जे काही बोलतोय तेदेखील रेकॉर्डवर आहे असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडभाजपाहिंदू