Join us

"मी पण नमुना आहे"...; नारायण राणेंनी केलेल्या टीकेला मनोज जरांगेचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 1:46 PM

१० फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे.

जालना/मुंबई - मराठा समाजाला आरक्षण आणि सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणीच्या मागणीसह मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी, मागासवर्ग आयोगाने मुख्यमंत्र्यांकडे सोपवलेल्या अहवालावरही त्यांनी भाष्य केले. यावेळी, केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी त्यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भातील प्रश्न जरांगेंना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना निलेश राणेंना विनंती आहे, त्यांना नारायण राणेंना थांबवावं, असे म्हटले. तसेच, इशाराही दिला आहे.

१० फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यातच, एकीकडे राजकीय उलथापालथ सुरू असताना दुसरीकडे राज्य सरकार मराठाआरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची तयारीही करत आहे. दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बोचरी टीका केली होती. जरांगेंनी मोदींना राज्यात फिरू न देण्याचा इशारा दिल्यानंतर राणे संतापले. त्यांनी ट्विट करुन, आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असे म्हटले होते. त्यावर, आता जरांगेंनीही प्रत्युत्तर देत आपली भूमिका मांडली आहे. 

मला आणखीही एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायची आहे. माझी निलेश राणेंना विनंती आहे की, त्यांनी नारायण राणेंना थांबवावं. कारण मलाही काही मर्यादा आहेत. मी कचाट्यात आलं की धुवून काढणार आहे. नारायण राणे यांच्याबद्दल माझ्या तोंडातून ब्र शब्द आहे का?, असा सवालही जरांगे यांनी केला. तसेच, मोदीसाहेबांनाही ओबीसी असल्याचा स्वाभिमान आहे. मग, आम्ही तर मराठ्यांसाठी मागतोय, मग तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे, तुम्हाला आमच्या बाजुने बोलायला स्वाभिमान पाहिजे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी नारायण राणेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. 

निलेश राणेंनी मोठ्या साहेबांना माझी शेवटची विनंती आहे. दुसऱ्यांदा मी सोडत नसतो, कोण आहे, काय आहे, आणि केवढ्याचा आहे हेही मी बघणार नाही. मी त्यांचं वय आहे, त्यांचा आदर करतो, मोठ्या किमतीचा माणूस आहे. पण, माझ्या भावना समजत असतील तर समजून घ्या, नाहीतर मी पुरा पाणउतारा करत असतो, सोडतच नसतो. त्यांचं आत्तापर्यंत ५ वेळा झालंय, आम्ही त्यांना ५ वेळा सांगितलंय की तुम्ही बोलू नका. पण, आता ऐकून आपली घ्यायची क्षमता नाही. ते जर मला चॅलेंज देत असतील तर मीपण लय नमुना आहे, मीही मराठाच आहे, असेही जरांगे यांनी म्हटले.  

काय म्हणाले होते नारायण राणे 

नारायण राणेंनी म्हटले होते की, ''मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव. तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत.'', असे ट्विट राणेंनी केले होते.  

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठाआरक्षणमराठा आरक्षणनारायण राणे निलेश राणे