मुंबई : मी एक सामान्य शिवसैनिक आहे, मुख्यमंत्रिपद माझ्या डोक्यात कधीही जाणार नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी वाटेला आले तर सोडतही नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ठणकावून सांगितले.
हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अनेक गाड्या भरून शिवसैनिक त्यासाठी आले होते. त्यांच्यासमोर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री झालो असलो तरी मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. तुमच्या कुटुंबातलाच एक माणूस सहाव्या मजल्यावर बसला आहे असे समजा.
शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे अगदी विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असताना ऐनवेळी शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यानंतर बांगर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखपदावरून हटविले होते. मात्र, बांगर हेच जिल्हाप्रमुखपदावर कायम असतील, असे शिंदे यांनी सांगितले. आधीच्या काळात शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले, तडीपाऱ्या झाल्या. मात्र मी मुख्यमंत्री असताना एकाही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही. पुढच्या अडीच वर्षांत एकाही शिवसैनिकाचा बाल बांका करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असेही शिंदे यावेळी म्हणाले.