मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियोजित वेळेनुसार दुपारी 1 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी कोरोना महामारीच्या संकटापासून ते राज्यातील विकासंदर्भातील विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. कोरोना संकट, समृद्धी महामार्ग, मेट्रो 3 प्रकल्प, राज्यातील शाळांचा प्रश्न, पर्यटन, धार्मिक स्थळं, गड किल्ल्यांसदर्भातही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. त्यावेळी, मेट्रो कारशेड आणि कांजूरमार्ग याबाबतही सविस्तर भाष्य करताना विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.
राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं आहे. विरोधकांकडून सातत्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीला टार्गेट करण्यात येत आहे. मुंबईतील कारशेडचा मुद्दा असो किंवा लाईट बिलात नागरिकांना न मिळालेली सवलत असो, यासह कोरोना आणि इतर बाबींसंदर्भातही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जातं. यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन राज्याचं होणारं नुकसान सांगत उद्धव ठाकरेंना अहंकारी असं संबोधलं होतं. आता, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या अहंकारी टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
मेट्रो कारशेडच्या विषयावरुन सध्या थयथयाट केला जातोय, मी अहंकारी. जरुर मी अहंकारी आहे, माझ्या मुंबईबद्दल मी अहंकारी आहे. माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय. मेट्रो 3 च्या लाईनसाठी कांजूरमार्ग आहे. आरे कारशेडसाठी आपण किती जागा घेतली होती, साधरणत: 30 हेक्टर जागा आपण घेतली होती. 5 हेक्टरमध्ये घटदाट झाडी असल्याने ती जागा वापरणार नसल्याचं आपण आज लेखी दिलंय. आता, ती जागा वापरणार नाही तर मग या प्रकल्पात घेतली कशाला? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. तसेच, 2023 उर्वरीत 25 हेक्टरची जागा वापरल्यानंतर पुन्हा ती 5 हेक्टरची जागाही वापरली जाणार, पुन्हा आणखी जागा घेतली जाईल. एका लाईनसाठी आपण जंगल नष्ट करायचं का, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
आता कांजूरमार्ग येथे 40 हेक्टर जागा आहे, तो सर्वच प्रदेश ओसाड आहे. यापूर्वी आरेला केवळ मेट्रो 3 ची लाईन होणार होती. पण, आता कांजूर येथे मेट्रो 3, 4 आणि 6 या तीन लाईनचे कारशेड आपण करू शकतो, हा फरक आहे. त्याहीपलिकडे, मेट्रोची लाईन ही अंबरनाथ व बदलापूरपर्यंत जाऊ शकते. पुढील 50 वर्षांच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. आम्ही करतोय, ते अहंकार आहे की कर्तव्य हे आता तुम्हीच सांगा, असेही त्यांन जनतेला उद्देशून म्हटले.