Join us

मला बळीचा बकरा बनवला जात आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:06 AM

सचिन वाझेचा ‘एनआयए’वर आरोप; कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आले, असा ...

सचिन वाझेचा ‘एनआयए’वर आरोप; कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आले, असा आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने ‘एनआयए’वर केला. मी कोणताही कबुलीजबाब दिला नाही. ‘एनआयए’ने माझी पुरेशी चौकशी केली आहे. त्यामुळे आणखी एनआयए कोठडी वाढवू नये, अशी विनंती वाझेतर्फे विशेष एनआयए न्यायालयाला करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ती अमान्य करुन त्याच्या एनआयए कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ केली.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटीनने भरलेली स्काॅर्पिओ कार ठेवल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला एनआयएने १३ मार्च रोजी अटक केली. त्याच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवत आणखी १५ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, मला याप्रकरणी बळीचा बकरा बनवण्यात आले आहे आणि या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, असे वाझेने न्यायमूर्ती प्रशांत सिंत्रे यांना सांगितले.

‘मी दीड दिवसांसाठी या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो आणि मला जे शक्य होते ते मी पूर्ण क्षमतेने केले. अचानकपणे योजनेत बदल करण्यात आला. मी स्वतः एनआयएच्या कार्यालयात गेलो आणि मला अटक करण्यात आली. मी कोणत्याही प्रकारचा कबुलीजबाब दिला नाही,’ असे वाझेने न्यायालयाला सांगितले.

या गुन्ह्यात एका पोलिसाचा हात आहे, हे बघून सर्वांना धक्का बसला. वाझेचा गुन्हा हा देश पातळीवरील एक मोठा गुन्हा आहे, असा युक्तिवाद करत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी जप्त केलेल्या स्कॉर्पिओमध्ये सापडलेले धमकीचे पत्र न्यायालयाला वाचून दाखवले.

पोलीस दलाने वाझेला ३० बंदुकीच्या गोळ्या दिल्या होत्या. त्यातील केवळ पाच सापडल्या. शिवाय तपासादरम्यान एनआयएने वाझेच्या घरातून एकूण ६२ बंदुकीच्या गोळ्या जप्त केल्या. एवढ्या गाेळ्या त्याने कुठून आणल्या व घरात का ठेवल्या, याचा तपास करायचा आहे, असे सिंग यांनी न्यायालयाला सांगितले.

ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा या प्रकरणाशी संबंध आहे. या प्रकरणात अटक केलेल्या दोन आरोपींचा ताबा बुधवारी एटीएसकडून एनआयएला मिळाला. वाझे आणि त्या आरोपींना समोरासमोर आणणे आवश्यक आहे. सध्या हिरेन हत्या प्रकरणाचा तपासही एनआयए करत आहे, असे सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. सिंग यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने ३ एप्रिलपर्यंत वाझेला एनआयए कोठडी सुनावली.

...........................