Join us  

Tanaji Sawant: वरिष्ठांमुळे मी शांत; ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यावेळी ८ दिवस हंगामा माजेल- तानाजी सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:38 AM

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांना त्यांच्या मुंबई-पुणे-मुंबई दौऱ्यावरुन सध्या सोशल मीडियात चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

मुंबई- शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांना त्यांच्या मुंबई-पुणे-मुंबई दौऱ्यावरुन सध्या सोशल मीडियात चांगलंच ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर त्यांच्या दौऱ्याचे फोटोही व्हायरल होत असून घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर, तसेच राखीव असा हा दौरा असल्याचे दिसून येते. पुण्यातील या कार्यालयातून त्या कार्यालयात आणि त्या कार्यालयातून घरात, अशा आशयाचं वेळापत्रक पाहून नेटीझन्सने त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. 

दरवेळी कोणत्याही नेते किंवा मंत्र्यांचा दौरा जाहीर झाला की त्यांचा विविध ठिकाणचा आढावा असतो. काही बैठका असतात महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी असतात, पत्रकार परिषद किंवा सभा असतात मात्र नवनिर्वाचीत आरोग्य मंत्री असलेल्या तानाजी सावंतांच्या दौऱ्यात कोणत्याही बैठका, सभा किंवा पत्रकार परिषद नसल्याने आणि या प्रवासादरम्यान पोलीसांचा कॉनव्हॉय तैनात असल्याने सगळीकडे या दौऱ्याची चर्चा होत आहे. 

या सदर प्रकरणावर आता स्वत: तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज मी पिंपरी-चिंचवडला गेलो. तेथील काही लोकांना भेटलो. माझ्या मतदारसंघात एकाचा मृत्यू झाला, तिकडे मी होतो. तसेच विविध कामांचा आढावा घेतला. जे कोणी राजकीय विरोधक आहे, त्यांनी सांगितलं की तानाजी सावंत यांचा एक किमी.चा दौरा आहे. शासनावर ताण येऊ नये, यासाठी मी सुरक्षा देखील टाळतो, असं सांगत वरिष्ठांच्या सूचनेमुळे मी शांत आहे. पण ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यावेळी मात्र ८ दिवस हंगामा माजेल, असा इशाराही तानाजी सावंत यांनी दिला आहे. 

दरम्यान, पुण्यात सध्या डेंग्यू आणि ताप साथीचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे, रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत असताना सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे काही ठोस निर्णय घेतील, आरोग्य विभागाच्या बैठका घेतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांचा दौरा पाहून पुणेकरांची निराशाच झाली आहे. दरम्यान, तानाजी सावंत हे शिंदे गटातील प्रमुख आमदारांपैकी एक असून पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक आरोग्यमंत्री या महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी शिंदे सरकारने त्यांच्यावर सोपवली आहे. 

टॅग्स :तानाजी सावंतएकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकार