Join us

मी आत्महत्या करतेय..., पोलिसाच्या मुलीचा सहानुभूतीसाठी व्हिडीओ ड्रामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 6:16 AM

‘आयपीएस लॉबी तसेच वरिष्ठांकडून वडिलांचा छळ झाला, त्यात आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवले. म्हणून मी आत्महत्या करतेय...’ असे म्हणत मुलुंडच्या रिया पालांडे आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या मीनाक्षी चौधरीने सोमवारी तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

मुंबई : ‘आयपीएस लॉबी तसेच वरिष्ठांकडून वडिलांचा छळ झाला, त्यात आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवले. म्हणून मी आत्महत्या करतेय...’ असे म्हणत मुलुंडच्या रिया पालांडे आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या मीनाक्षी चौधरीने सोमवारी तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडीओमुळे नानाविध चर्चा रंगल्या. मीनाक्षीने सहानुभूतीसाठी व्हिडीओ व्हायरल केल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले.मुलुंड पूर्वेकडील समर्थ व्हिलामध्ये रिया पालांडे या मुलगा शुभम आणि मुलगी श्रद्धासोबत गेल्या चार वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहत होत्या. २३ नोव्हेंबर रोजी एल. ए. ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामोदर चौधरी, पत्नी भारती चौधरी आणि मीनाक्षी यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. दोघांमध्ये ३० लाखांच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारे नवघर पोलिसांनी चौधरी कुटुंबीयांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे २४ नोव्हेंबरपासून घरातून गायब झालेला रिया पालांडे यांचा मुलगा अजूनही परतलेला नाही. त्याचाही शोध पोलीस घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून चौधरी कुटुंबीय बेपत्ता झाले. अटकपूर्व जामिनासाठी त्यांची धडपड सुरू असताना मुलगी मीनाक्षीला जामिन मंजूर झाला.अटकपूर्व जामिनावर बाहेर असलेल्या मीनाक्षीने एक व्हिडिओ व्हायरल केला. यात तिने वडिलांवर आयपीएस लॉबी तसेच वरिष्ठांकडून वेळेवेळी अन्याय झाला. तसेच रिया पालांडेबाबतही त्यांना अडकविण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांकडून आम्हाला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करत असल्याचे तिने व्हीडिओमध्ये म्हटले आहे.मात्र हा व्हिडीओ फक्त सहानुभूती मिळविण्यासाठी तिनेच व्हायरल केल्याचे नवघर पोलिसांचे म्हणणे आहे. मुलगी तिच्या राहत्या घरी सुखरुप आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहितीही नवघर पोलिसांनी दिली.पोलिसाच्या मुलीने व्हायरल केलेला हा व्हिडीओ फक्त सहानुभूती मिळविण्यासाठी व्हायरल करण्यात आल्याचे नवघर पोलिसांचे म्हणणे आहे. मुलगी तिच्या राहत्या घरी सुखरुप आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहितीही नवघर पोलिसांनी दिली.

टॅग्स :पोलिस