मुंबई - आमदार संजय निरुपम यांनी त्यांच्या अध्यक्षपदावरील वादाबाबत बोलताना थेट राहुल गांधींनाच मध्यस्थी घेतले आहे. मी राहुल गांधींशी एकनिष्ठ आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी माझी निवड ही राहुल गांधींनीच केली. तसेच मुंबईत जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा आदेशही मला राहुल गांधींनीच दिल्याचे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसमधील निरुपम समर्थकांनी आज काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.
काँग्रेसच्या निरुपम गटातील नेत्यांनी आज महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार असलम शेख, माजी मंत्री सुरेश शेट्टी, जावेद खान, मनपा विरोधी नेते रवी राजा, माजी आमदार बलदेव खोसा, चरण सिंग सप्रा, जिल्हाध्यक्ष अशोक सूत्राले, हुकूमराज मेहता, महिला अध्यक्ष डॉ अजंत यादव, कचरू यादव, बब्बू खान, सतीश मनचनदा, गुजराथी सेलचे अध्यक्ष उपेंद्र दोषी, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरेंद्र उपाध्याय, सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडवीलकर व ब्रिजमोहन शर्मा आणि काही नगरसेवक हजर होते. या भेटीवेळी संबंधित नेत्यांनी सत्य परिस्थिती कथन केली. तसेच निरुपम यांच्याबाबत तक्रारी करणारे नेतेच भाजपच्या वाटेवर आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, अशी माहितीही दिली. काँग्रेस नेत्यांनी आमदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची बाजू मांडली. तर, तक्रार करणारे नेते पक्षाची प्रतिमा मलीन करत आहेत, अशी माहितीही मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील यांनी खर्गे यांना दिली.
दरम्यान, संजय निरुपम यांनीही पत्रकारांशी बोलताना मी केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे आदेश मानतो, असे म्हणत माझी निवड राहुल गांधींनीच केल्याचे म्हटले.