मुंबई/हिंगोली - शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर व कावड यात्रेतील डी.जे. चालकावर कळमनुरी पोलिसांत गुन्हा नोद करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत काढलेल्या कावड यात्रेत जनसमुदायासमोर हातात तलवार घेवून उंचावल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आमदार बांगर यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. तसेच, मी मुख्यमंत्री झालो तर राज्यातील सर्व पोलिसांना भगव्या टोप्या देईन, असेही त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
२८ ऑगस्ट रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत आ.संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली. या कावड यात्रेत हिंगोली ते कळमनुरी मार्गावर ऋषि ढाब्याजवळ आ. बांगर यांनी हातत तलवार घेवून हवेत वार केले. दरम्यान, मी मुख्यमंत्री झालो तर मला आवडेल, असं विधानही आमदार संतोष बांगर यांनी केलं होतं. त्यासंदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना मला आनंद होईल, असे आव्हाड यांनी म्हटले. तसेच, बांगर यांच्या कावड यात्रेतील लूकवरुन मिश्कील टिपण्णीही केली.
मला अतिशय आनंद होईल, माणसाने महत्वाकांक्षी असावं, स्वप्न पाहावीत. महाराष्ट्राची आजची परिस्थिती पाहता, स्वप्न सत्यात उतरतील हे महाराष्ट्रात शक्य झालंय. मग, संतोष बांगर स्वप्न बघत असेल तर त्यात वाईट काय. मला आनंद हा आहे की, आमच्यातील एक वंजारी स्वप्न बघतोय. स्वप्न सत्यात उतरेल की नाही, हे नंतर समजेल पण स्वप्न तरी बघतोय, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतोष बांगर यांच्या विधानाचं समर्थन केलंय. दरम्यान, यापूर्वी बीडच्या सभेत भाषण करतानाही आव्हाड यांनी आपल्या जातीचा उल्लेख करत मी वंजाऱ्याचा पोरगा असं म्हटलं होतं
शिवाजी महाराजांसारखी तलावर काढत, बॉडी दाखवत तो हिंमत दाखवतोय, असा मुख्यमंत्री आवडेल मला. महाराष्ट्राच्या बदललेल्या संस्कृतीत संतोष बांगरचं महत्त्वाचं स्थान आहे. आपला दोस्त आहे, माझ्या भावासारखा आहे तो. त्याच्या मनातील इच्छा काय आहेत, तो आज कुठे आहे आणि का? हे मला चांगलं माहिती आहे.
मी मुख्यमंत्री झालो तर... - बांगर
''राज्यात आमची सत्ता आली, तर सर्वांना भगव्या टोप्या देईल, असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळे कदाचित मी मुख्यमंत्री झालो, तर सर्व पोलिसांना भगव्या टोप्या देईन,'' असं संतोष बांगर यांनी म्हटलं