मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ख्रिस्मसशी संबंधित चॅरिटी कार्यक्रमात हजेरी लावल्याने ट्विटरवर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र अमृता फडणवीस यांनी टीकाकारांना सणसणीत उत्तर देत त्यांचं तोंड बंद केलं. अमृता फडणवीस यांनी देश, धर्म आणि मानवतेला कोणताही धर्म नसल्याचं सांगत हिंदुत्व शिकवणा-यांना उत्तर दिलं. टीका करणा-यांमध्ये स्तंभलेखिका शेफाली वैद्य यांचादेखील समावेश होता.
अमृता फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत एफएम चॅनेलच्या चॅरिटी शोच्या ख्रिसमस थिम प्रमोशनला हजेरी लावली होती. त्यांनी ट्विटरवर कार्यक्रमाचे फोटोही शेअर केले होते. अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं होतं की, '92.7 बीग एफएमच्या अम्बेसेडर म्हणून ‘बी सँटा’ अभियानाला सुरुवात केली. लोकांकडून गिफ्ट, वस्तू जमा करुन, त्या गरीब मुलांना वाटण्यात येतील, जेणेकरुन या ख्रिसमसला त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेलं. तुमच्या जवळच्या गिफ्ट बॉक्समध्ये तुमच्या भेटवस्तू जमा करा, आणि या दानातून तुमचा आनंद द्विगुणित करा'. दुस-या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, 'प्रेम, दान आणि सद्भावनेला कोणताही धर्म नसतो. सर्व सकारात्मक स्वीकारु आणि नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहू'.
यावेळी सोशल मीडियावर काहीजणांनी त्यांच्यावर ख्रिश्चन धर्माला प्रमोट करण्याचा, हिंदूंना ख्रिश्चन धर्माकडे वळवण्याचा आरोप करण्यास सुरुवात केली. अनेकांनी तर अमृता फडणवीस यांच्यावर आपल्या संस्कृतीचा नाश केल्याचा आरोप केला. शेफाली वैद्य यांनीही अमृता फडणवीस यांना विचारलं की, 'पण ख्रिश्चन हा धर्म आहे ना? तुम्ही धर्मप्रसारकांना धर्मपरिवर्तनाचं काम थांबवायला सांगा, त्यानंतर मी तुमच्या प्रेम आणि सकारात्मक दान मोहिमेत सहभागी होईन'.
यानंतर अमृता फडणवीस यांनी टीकाकरांना प्रत्युत्तर देत तुम्ही विना फटाक्यांच्या दिवाळीला विरोध का केला नाही ? हिंदू सणावेळी गरिबांसाठी काही केलं का नाही ? असे प्रश्न विचारले. 'मी हिंदू आहे, त्याचा मला इतरांप्रमाणे अभिमानही आहे. मी माझ्या देशात प्रत्येक सण साजरा करते. तसं प्रत्येक सण साजरा करावा की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आमच्या देशाच्या खऱ्याखुऱ्या प्रेम भावनेचं प्रतिनिधित्व करतो. यामुळे देश, धर्म आणि मानवतेला बाधा येत नाही', असं सणसणीत उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं.