Join us

'मी सर्वात भ्रष्ट अन् नालायक आमदार', शेवटच्या दिवशी खडसे गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 8:27 PM

विरोधी पक्षनेतेपदी असताना मी नेहमीच पुराव्यनिशी सभागृहात मुद्दे मांडले

मुंबई - भाजपा नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात गहिवरल्याचे पाहायला मिळाले. फडणवीस सरकारच्या अधिवेशनातील शेवटच्या दिवशी बोलताना एकनाथ खडसेंनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. माझ्या जीवनात मी एकही निवडणूक पराभूत झालो नाही. गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकही आरोप माझ्यावर झाला नाही, असे खडसेंनी म्हटले.  

विरोधी पक्षनेतेपदी असताना मी नेहमीच पुराव्यनिशी सभागृहात मुद्दे मांडले. आरोप-प्रत्यारोप हे सभागृहात होतच असतात, पण मी पुराव्यासह सभागृहात आरोप केले. बिनबुडाच्या आरोपाने काय वेदना होतात, हे मला चांगलच माहित आहे. विधानसभेतील 288 आमदारांपैकी सर्वात भ्रष्ट अन् नालायक आमदार म्हणून मी आज उभा आहे, अशी खंत खडसेंनी बोलून दाखवली. 

दाऊदच्या बायकोशी माझ्या फोनवरुन संभाषण झाल्याचे आरोप माझ्यावर करण्यात आले. पण, दाऊदला सोडून तिला नाथाभाऊशी का बोलावं वाटेल? असा मजेशीर प्रश्नही खडसेंनी सभागृहात विचारला. विशेष म्हणजे सभागृहातील सदस्यांपैकी कुणीही माझ्यावर आरोप केले नाहीत, बाहेरील व्यक्तीने हे आरोप माझ्यावर केले आहेत. त्यापैकी एटीएस आणि इतर यंत्रणांच्या चौकशीत काहीच सिद्ध झालं नाही. त्यामुळे मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही बरं वाटलं. पण, जे नुकसान व्हायचंय ते होऊन गेलं, असं म्हणत खडसेंनी आपली खदखद पुन्हा व्यक्त केली. 

मी जमीनदाराचा मुलगा आहे, शेतीव्यतीरिक्त माझा कुठलाही उद्योग नाही. मी एक इंचही जमीन घेतली नसताना, न्यायमूर्ती झोटींग समिती नेमूण माझी चौकशी झाली. माझ्या बायका-बोरांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं, असं सांगताना खडसे गहिवरले. यावेळी सभागृहही शांत झाले होते. मी शेवटच्या दिवशी यासाठी उभा आहे कारण हा भ्रष्ट, नालायक, चोर उच्चका सदस्य म्हणून या सभागृहातून मला जायचं नाहीये. सभागृहाला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की हा डाग मला घेऊन जायची संधी देऊ नका असं आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.

टॅग्स :एकनाथ खडसेविधान भवनविधानसभाभाजपामुंबई