मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटीसीनंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन आ देखे जरा किसमे कितना है दम... असे म्हणत भाजपा नेत्यांना आणि मोदी सरकाराल चॅलेंज दिले होते. त्यानंतर, आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी भाजपावर जहरी टीका केली. तसेच, मै नंगा आदमी हूँ, बाळासाहेब ठाकरेंका शिवसैनिक हूँ... मी कुणाला घाबरत नाही, अशा शब्दात भाजपाला इशारा दिला आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) आमच्याकडून माहिती, कागदपत्रं मागितली आहे. आम्ही त्यांना आवश्यक माहिती देत आहोत. ईडीनं अद्याप तरी त्यांच्या नोटिशीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही. मग भारतीय जनता पक्षाच्या माकडांना ही माहिती कुठून मिळाली, ते कालपासून उड्या कसे काय मारू लागले, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीनं समन्स बजावलं असून त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली.
'केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा ईडी, सीबीआयसारखी हत्यारं वापरावी लागतात. त्यामुळेच वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईकांना ईडीकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेत असलेले नेते जेव्हा दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा त्यांना असे कागदाचे तुकडे पाठवले जातात. पूर्वी सीबीआय, ईडीनं कारवाई केली की लोकांना त्याबद्दल गांभीर्य वाटायचं. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कारवाया म्हणजे केंद्रातल्या पक्षानं भडास काढणं हे लोकांनी गृहित धरलंय,' अशा शब्दांत राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासोबत भाजपाची लंडनमध्ये फौज तयार होईल. तुम्हा माझ्या नादी लागू नका, मै नंगा आदमी हूँ, मै शिवसैनिक हूँ बाळासाहेब ठाकरेंका. जे करायचंय ते करा, मी आपल्यासारखे मी खूप पाहिलेत, अनेकांना उखडून टाकलंय, असे म्हणत राऊत यांनी भाजपाला इशाराच दिलाय. तसेच, राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 'गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ३ नेते ईडीच्या कार्यालयात जातात. तिथून ते काही कागदपत्रं घेऊन बाहेर येतात. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि त्यांचे हस्तक मला भेटायचा प्रयत्न करत आहेत. राज्यातलं सरकार टिकू देऊ नका म्हणून माझ्यावर विविध मार्गांनी दबाव आणला जात आहे,' असा गंभीर आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
'राज्यातलं सरकार आम्ही पाडायचं ठरवलं आहे. त्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. मला इशारे दिले जात आहेत. धमकावण्याचा प्रयत्न होत आहे. पण मी त्यांचा बाप आहे. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही,' अशा इशारा त्यांनी भाजपला दिला. 'माझ्यावर दबाव आणण्यासाठी शिवसेना आमदारांची नावांची यादी दाखवली गेली. या आमदारांना ईडी ताब्यात घेईल. त्यांचे राजीनामे घेतले जातील. सरनाईक हे याच कारवाईचं टोकन आहे, असं सांगण्यात आलं. पण तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे सरकार पडणार नाही,' अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर जोरदार शरसंधान साधलं