माझं वय 85 नाही, पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर शरद पवारांचं मिश्कील उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 02:41 PM2020-07-26T14:41:07+5:302020-07-26T14:43:56+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमी खासदार शरद पवार हे राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ते सोलापूर दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर, शनिवारी औरंगाबाद येथील कोरोना परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला.
मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून रुग्णांची संख्याही वाढत आहे. अनेक जिल्ह्यात पुनश्च लॉकडाऊन पुकारण्यात आला असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार राज्यातील हॉटस्पॉट आणि कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. अर्थातच, 80 वर्षांचा तरुण म्हणून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कामाचं कौतुक झालाय. आताही, ते त्याच जोमाने फिरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांना एका प्रत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी मिश्किल टीपण्णी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमी खासदार शरद पवार हे राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ते सोलापूर दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर, शनिवारी औरंगाबाद येथील कोरोना परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी, शरद पवार यांना पत्रकाराने प्रश्न विचारत, त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. 'आपले वय जास्त असून तुम्ही राज्यभर फिरत आहात. त्यामुळे, आपल्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो, असा प्रश्न औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारला होता. त्यावर, शरद पवार यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. माझे वय 80 वर्षे आहे, पण ते 85 वर्षे असल्यासारखे प्रश्न तुम्ही मला विचारता,'' असे पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
मालेगांव धारावीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. जे सहकार्य तिथल्या लोकांनी केले तसेच सहकार्य औरंगाबाद शहरातील जनताही करेल आणि संकटावर मात करेल, अशी खात्री वाटते. pic.twitter.com/vN9Gx92xcc
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 25, 2020
मी माणसांत रमणारा माणूस आहे, मला लोकांमध्ये जाऊन काम करायला आवडतं. त्यामुळे, मी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरे करत असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर फिरत नाही, यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, कोरोनाचे संकट राज्यात सर्वत्र पसरल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाण्यात अर्थ नाही. त्यांनी एकाच ठिकाणी बसून सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणे अधिक गरजेचे आहे, असे पवार यांनी म्हटले.
दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच, राज्यात गेल्या 24 तासांत ९ हजार २५१ नवीन बाधितांची नोंद झाली, तर २५७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख ६६ हजार ३६८ इतकी झाली आहे. तर बळींचा आकडा १३ हजार ३८९ झाला आहे. राज्यात शनिवारी ७ हजार २२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २ लाख ७ हजार १९४ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के झाले आहे.