Join us

'एका पराभवाने खचून जाणारी मी नाही, भाजपा सोडणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 9:58 AM

पंकजा मुंडे या भाजपात नाराज असल्याची चर्चा रंगली होती. तर, भाजपमधील काही

मुंबई - लाक्षणिक उपोषण मराठवाड्याच्या पाणी प्रश्नांवर लक्षवेधून घेण्यासाठी सकारात्मक भावनेने केलेले होते, याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की घेतील असा आशावाद माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्तालयासमोर सुरु असलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या समारोपप्रसंगी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, मी भाजप सोडणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सकारात्मक भावनेतून हे उपोषण केले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

पंकजा मुंडे या भाजपात नाराज असल्याची चर्चा रंगली होती. तर, भाजपमधील काही नेत्यांनी जाणीवपूर्वक पंकजा यांचा पराभव घडवून आणला असा आरोपही करण्यात येत होता. यावर पंकजा यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जयंती सोहळ्यात स्पष्टीकरण दिले होते. तसेच, मी मराठवाड्याच्या पाण्यासाठी उपोषण करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यानुसार, 27 जानेवारी रोजी त्यांनी औरंगाबाद येथे एक दिवसीय लाक्षणीक उपोषण केले. त्यानंतर, पुन्हा एकदा मी भाजपा सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.  

हे उपोषण कोणत्याही पदासाठी किंवा अपेक्षांसाठी नाही, तुमच्या बळावर हे उपोषण करत आहे, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापुढे समाजसेवक म्हणून काम करणार असून जनतेसाठी लढा देणार आहे. तुमच्या मनात माझे स्थान असेच कायम अबाधित ठेवा. मराठवाडयाला हक्काचे पाणी मिळावे, यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन प्रश्न मांडणार आहे. भविष्यात दखल घेतली गेली नाही तर टीका करायलाही मागे पुढे पहाणार नाही. मराठवाडा ही माझी कर्मभूमी आहे, इथल्या जनतेसाठी आम्ही केलयं आणि म्हणूनच ताठ मानेने न्याय मागण्यांसाठी उपोषण करतेय, असेही पंकजा यांनी म्हटले. 

माझ्या पराभवाने तुम्ही दुःखी झालात, हे मी समजते पण डळमळून जाऊ नका, एखाद्या पराभवाने खचून जाणारी मी नाही, तुम्ही माझी संपत्ती आहात. सकारात्मक भावनेतून केलेले हे उपोषण आक्रमक होणार नाही याची काळजी सरकार घेईल, असेही पंकजा यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन म्हटले आहे.  

टॅग्स :पंकजा मुंडेआंदोलनऔरंगाबादभाजपादेवेंद्र फडणवीस