मी रेडीमेड आमदार नाही, त्या प्रश्नावर बावनकुळेचं अमोल मिटकरींना थेट प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 05:34 PM2021-06-22T17:34:18+5:302021-06-22T17:36:46+5:30
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना बावनकुळेंनाच प्रतिप्रश्न केला आहे.
मुंबई - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदारप्रताप सरनाईक शनिवारी (19 जून) माध्यमांसमोर आले. सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्यात आपलं मत मांडलं आहे. यामध्ये त्यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला आहे. याबाबत, प्रताप सरनाईकच नाही, तर शिवसेनेचे 90 टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज आहेत, असे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल आहे. बावनकुळेंच्या या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना बावनकुळेंनाच प्रतिप्रश्न केला आहे. 'बावनकुळे यांनी प्रताप सरनाईक व मविआ सरकारबाबत बोलण्यापेक्षा विधानसभेवेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं, याचं चिंतन करावं. प्रताप सरनाईक यांचं लेटर अनेक अंगानी भाजपलाच डिवचणारं असून भाजपाच्या राजकीय दहशतवादाचं दर्शन घडवणारं आहे, असे मिटकरी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.
बावनकुळे यांनी प्रताप सरनाईक व मविआ सरकारच्या बाबत बोलण्यापेक्षा विधानसभेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं याचं चिंतन करावं. प्रताप सरनाईक यांचं लेटर अनेक अंगानी भाजपलाच डिवचणारं असून भाजपाच्या राजकीय दहशत वादाचं दर्शन घडवणारं आहे.@TV9Marathi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 22, 2021
आता, मिटकरींच्या या ट्विटला प्रत्युत्तर देताना मी रेडीमेड आमदार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटलं आहे. मिटकरी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, मी भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्षाने मला खूप काही दिले आहे. मी रेडिमेड आमदार नाही. मी कार्यकर्ता आहे, असे स्पष्टीकरणही बावनकुळे यांनी दिलंय.
मिटकरी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, मी भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्षाने मला खूप काही दिले आहे. मी रेडिमेड आमदार नाही. मी कार्यकर्ता आहे.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 22, 2021
काय म्हणाले होते बावनकुळे
प्रताप सरनाईकच नाही, तर शिवसेनेचे 90 टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज आहेत. तसेच, सरकारमध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीच कामं होत आहेत. काँग्रेस–राष्ट्रवादी आपला पक्ष मजबूत करतायत, शिवसेना कमजोर होत आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार आणि आमदार या सरकारवर नाराज आहेत. वीज कापल्याने शिवसेना आमदारांवर लोकांचा रोष कायम आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको, असा गौप्यस्फोटही बावनकुळे यांनी केला आहे.