लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांना मी स्थगिती दिली अशा बातम्या येत असतात. अशा प्रकल्पांना स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही, असे जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत विरोधकांना दिले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वनच आहे आणि राहील, असेही ते म्हणाले.
शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मीदेखील त्यांच्यासोबत होतो. अजितदादाही होते. त्यामुळे त्या निर्णयांची जबाबदारी आम्हा तिघांची आहे. विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली, मंत्र्यांनी स्थगिती दिली तरी फडणवीसांनी शिंदेंच्या निर्णयांना स्थगिती दिल्याच्या बातम्या चालविल्या जातात. त्यात काहीच तथ्य नाही. एक बरे आहे अजितदादांच्या वाट्याला कोणी जात नाही, कारण ते थेट अटॅक करतात, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातील काही नेते गुजरातचे अँबेसेडर झाल्याचा टोला लगावत या नेत्यांनी एक लक्षात ठेवावे की गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या ९ महिन्यांत महाराष्ट्राने प्राप्त केली हा आकडा १ लाख ३९ हजार ४३४ कोटी रुपये आहे. फडणवीस यांनी "साऱ्याच शंकांची मागू नका उत्तरे, अशा शंकेखोरांचे कधी झाले भले" अशी कोटीही केली.
दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका
दावोसमध्ये महाराष्ट्राने विक्रमी गुंतवणूक आकर्षित केली. एखादे राज्य जेव्हा १६ लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित करते तेव्हा त्याचा डंका जगात वाजतो. महाराष्ट्राच्या पॅव्हिलियन बाहेर जणू रांग लागावी अशीच स्थिती होती. मात्र, असे असतानाही आमच्यावर टीका झाली, की भारतातीलच कंपन्यांसोबत दावोसमध्ये जाऊन करार केले. पण आदित्य ठाकरे जेव्हा दावोसला गेले होते तेव्हादेखील त्यात बहुतांश भारतीय कंपन्याच होत्या असे सांगत त्यांची यादीच फडणवीसांनी वाचून दाखविली. त्यातील बऱ्याच कंपन्यांनी माघार घेतली आहे, असे फडणवीस म्हणाले.