मुंबई : माझी मुलगी अभ्यासात हुशार होती. तिला आयपीएस बनायचं होतं. मात्र तिला चार वर्षांपासून रक्ताची दुर्मिळ व्याधी असल्याने ती त्याविरोधात संघर्ष करीत होती. वाडिया रुग्णालयातील उपचारदरम्यान तिचा मेंदू मृत झाला. डॉक्टरांनी अवयवदानासंदर्भात संमती विचारली. मी तात्काळ होकार दिला. मला अभिमान आहे माझ्या मुलीने चौघांना जीवदान दिले, अशी भावना १२ वर्षीय मेंदूमृत अवयवदात्री वैदेहीची आई प्रणिता तानवडे यांनी व्यक्त केली.
सांताक्रूझ येथील फाटक हायस्कूलमध्ये आठवीत शिकणाऱ्या वैदेही तानवडे हिला इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया हा रक्ताचा दुर्मिळ विकार होता. तिच्यावर चार वर्षांपासून उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यात शनिवारी पहाटे तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मेंदूमृत घोषित केले.
वैदेहीला सोमवारी मेंदूमृत घोषित केल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तात्काळ तिच्या अवयवदानाला समंती दिली. या अवयवदानातून दोन किडन्या, हृदय आणि लिव्हर या अवयवांचे दान करण्यात आले.
हे मुंबई शहरातील या वर्षातील अठ्ठाविसावे
अवयव दान आहे. त्यामुळे चार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. एक किडनी वाडिया रुग्णलयातील एका रुग्णाला, तर दुसरी किडनी महापालिका रुग्णालयाला देण्यात आली. लिव्हर परळ येथील खासगी रुग्णालयाला आणि हृदय चेन्नईच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
वैदेहीला आणखी एक लहान बहीण आहे. तानवडे कुटुंबीय मुलीच्या उपचारासाठी खूप मेहनत घेत होते. नोकरदारांना टिफीन पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. सर्व उपचाराचा खर्च तानवडे याच व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर करत होते.
मी चार वर्षे मुलीसाठी रुग्णालयात चकरा मारत आहे. अवयवदानाची गरज असलेले अनेक रुग्ण मी पाहिले आहेत. त्यामुळे माझ्या मुलीचा मेंदू मृत झाल्यानंतर अवयवदानास होकार दिला. माझी मुलगी देहाने सोबत नसली तरी अवयवरुपी जिवंत आहे. अवयव वाया जाण्यापेक्षा ते कुणाला तरी मिळाले, याचे मला समाधान आहे.
- प्रणिता तानवडे, वैदेहीची आई
काय होता आजार?
इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया हा एक दुर्मिळ रक्तविकार आहे. या आजारात रक्त गोठण्याची क्रिया होत नाही. तुम्हाला सहजपणे जखम होऊ शकतात. जखम झाल्यास सर्वसाधारण लोकांपेक्षा अधिक रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा शरीरात विनाकारण रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो. कधीकधी, हा आजार उपचारांशिवाय काढता पाय घेतो, परंतु वैदेच्च्या बाबतीत हे घडलं नाही.