Join us

मी शिवरायांचा मावळा, हल्ले करणाऱ्यांना घुसून मारणार, मोदींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 9:51 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडला

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत झालेल्या आपल्या प्रचारसभेत पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना काँग्रेसच्या कार्यकाळावर जोरदार टीका केली. एक काळ होता जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट व्हायचे. यातील बहुतांश बॉम्बस्फोट काँग्रेसच्या कार्यकाळातच झाले. मात्र काँग्रेसने याला जबाबदार असणाऱ्यांवर काहीही कारवाई केली नाही. तर केवळ मंत्री बदलण्याचे काम केले. मात्र मी शिवरायांचा मावळा आहे. मी हल्ला करणाऱ्यांना घरात घुसून मारणार, असा टोला पंतप्रदान नरेद्र मोदींनी लगावला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षांमध्ये भ्रष्टाचार कमी झाला. त्यामुळे वृत्तपत्रांत येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्याही कमी झाल्या. या पाच वर्षांत मी अनेक भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. आता पुन्हा सत्ता आल्यास त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली जाईल. गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्यांवरील कर वाढवला नाही. मात्र करदात्यांची संख्या वाढवली.  महागाई चर्चेतून गायब झाली  आहे. दहा टक्क्यांनी वाढणारा महागाईचा दर चार टक्क्यांवर रोखला. सर्वात वेगवान विकास आणि कमी महाराई असे दुहेरी यश मिळवले. कर्जावरील ईएमआय घटवला. मागासवर्गीयांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी व्यवस्था केली. त्यामुळे गृहकर्जावर पाच ते सहा लाख रुपयांची बचत होऊ लागली, मुंबईत मेट्रो ट्रेनचे जाळे निर्माण केले जात आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली, काँग्रेसची देशातील स्थिती विदारक झाली आहे. स्वातंत्रोत्तर काळानंतर पहिल्यांदाच 2014 मध्ये काँग्रेसने सर्वात कमी जागा जिंकल्या. आता तर काँग्रेस आतापर्यंतच्या सर्वात कमी जागांवर लढत आहे. काँग्रेसचे विसर्जन करा, असे गांधीजींनी सांगितले होते. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा आणि एनडीएचीच सत्ता येणार आहे. तर काँग्रेस 44 जागांचा आकडा पार करून पन्नाशी गाठणार की 40 वर अडकणार हीच चर्चा सुरू आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला.   

टॅग्स :नरेंद्र मोदीमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019मुंबई उत्तर पश्चिम