Congress Zeeshan Siddique ( Marathi News ) : काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी आणि त्यांचे वडील बाबा सिद्दिकी हे काँग्रेसला धक्का देत काही दिवसांत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र झिशान सिद्दिकी यांनी आज माध्यमांशी संवाद साधत या चर्चा फेटाळून लावल्या असून मी काँग्रेस पक्षासोबतच आहे. पक्षबदल करण्याचा माझा कोणताही विचार नाही, असा दावा सिद्दिकी यांनी केला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना झिशान सिद्दिकी म्हणाले की, "सकाळपासून सुरू असलेल्या चर्चांनी मला आश्चर्य वाटलं. माझं पक्षबदलाविषयी कोणाशीही बोलणं झालेलं नाही." दरम्यान, वडील बाबा सिद्दिकी यांच्याबाबत विचारलं असता तुम्ही त्यांनाच हा प्रश्न विचारला तर योग्य राहील, असं झिशान सिद्दिकींनी म्हटलं आहे. "मी आणि माझे वडील दिवसभर काम करतो, राजकारण करतो. त्यामुळे घरी आल्यानंतर आम्ही राजकीय विषयांवर चर्चा करत नाहीत. तुम्ही त्यांच्या निर्णयाविषयी त्यांनाच विचारलं तर योग्य राहील. मी माझ्याविषयी तुम्हाला सांगू शकेल," असं ते म्हणाले.
अजित पवारांवर स्तुतीसुमने
एकीकडे पक्षबदल करणार असल्याच्या चर्चा फेटाळत असताना झिशान सिद्दिकी यांनी दुसरीकडे मात्र महायुतीत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार स्तुतीसुमने उधळली आहेत. "अजितदादांसोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबत आमचे कौंटुबिक संबंध राहिलेले आहेत. जेव्हा आम्ही महाविकास आघाडीत सोबत होतो तेव्हा माझ्यावर अन्याय होत असताना अजितदादांनी मला खूप मदत केली होती आणि ते भविष्यातही मदत करतील, अशी मला आशा आहे," असं झिशान सिद्दिकी यांनी म्हटलं आहे.