मी अन् अर्जुन खोतकरांनी जूने वाद विसरून एकत्र काम करायचं ठरलं आहे - रावसाहेब दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 02:47 PM2022-07-25T14:47:29+5:302022-07-25T14:51:25+5:30
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
नवी दिल्ली/मुंबई- माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. जालना जिल्ह्यात खोतकर आणि दानवे हे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र यावेळी एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीदरम्यान दोघेही उपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या भेटीनंतर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मला आणि अर्जुन खोतकर यांना बोलावले होते. मागचे वाद-विवाद सोडून द्या, असं सांगितलं. तसेच त्यानंतर मी आणि अर्जुन खोतकरांनी देखील सर्व विसरुन एकत्र काम करण्यास तयार असल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
नवी दिल्ली- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. pic.twitter.com/glFsW7898S
— Lokmat (@lokmat) July 25, 2022
माजी मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसांचा औरंगाबाद दौरा करून गेले अन् जालन्यात शिवसेनेला मोठा झटका बसल्याची चर्चा आहे. माजीमंत्री अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मागील काही दिवसांमध्ये खोतकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची दुसऱ्यांदा भेट झाली आहे.
दरम्यान, दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर, भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मागील काही दिवसांतील शिंदे - खोतकर यांची ही दुसरी भेट होती. तसेच खोतकर आणि मुखमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी खा. हेमंत पाटील यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्जुन खोतकर यांच्यात चर्चा सुरु असून लवकरच याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.