स्वच्छतेसाठी मी आणि माझा आवाज सदैव तुमच्यासोबत! - अमिताभ बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 04:04 AM2019-02-07T04:04:58+5:302019-02-07T04:05:21+5:30
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘दरवाजा बंद’ अभियानाच्या दुसऱ्या मोहिमेचे बुधवारी महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘दरवाजा बंद’ अभियानाच्या दुसऱ्या मोहिमेचे बुधवारी महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचा वापर जनजीवनाचा भाग बनावा या उद्देशाने या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमास बच्चन यांच्यासह राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, केंद्रीय सचिव परमेश्वरन अय्यर, जागतिक बँकेचे हिशाम काहीन यांच्यासह राज्यातील विविध जिल्हा परिषदांचे सदस्य उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानामुळे देशात स्वच्छतेबद्दल जागृती झाल्याचे सांगून अमिताभ म्हणाले की, देशात अलीकडच्या काळात स्वच्छतेचे जे काम झाले आहे त्याचे सारे श्रेय गावागावांत काम करणाºया स्वच्छता आग्रहींचे आहे. हागणदारीमुक्त आणि उघड्यावरील शौचमुक्त भारतासाठी स्वच्छतागृहांचा वापर हा जीवनशैलीचा भाग बनायला हवा. यापूर्वी मी पोलिओ मुक्तीसाठी काम केले आहे.
देश पोलिओमुक्त झाला आहे. आता स्वच्छ भारत मिशनमध्ये मी काम करतोय. स्वच्छतेच्या कामासाठी मी आणि माझा आवाज नेहमी तुमच्या सोबत राहील, असे सांगतानाच ‘स्वच्छ तन, स्वच्छ मन, स्वच्छ भारत, मेरा परिचय’ या काव्यपंक्ती त्यांनी उद्धृत केल्या.
परमेश्वरन अय्यर म्हणाले, चार वर्षांपूर्वी देशात फक्त ३९ टक्के शौचालये होती. स्वच्छ भारत मिशनमुळे आज देशभरात ९८ टक्के शौचालये बांधण्यात आली आहेत. देशातील २ लाख ५० हजार ग्रामपंचायतींनी स्वच्छ भारत मिशनमध्ये सक्रिय सहभाग घेतला. शाश्वत स्वच्छतेसाठी देशभर दरवाजा बंद-२ ही जाहिरात मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारतमुळे चार वर्षांत महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलल्याचे बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात ६८ लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. अमिताभ बच्चन यांचा स्वच्छ भारत मिशनमधील सक्रिय सहभाग राज्याला उपयुक्त ठरला आहे. सरपंचापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि ग्रामसेवकापासून ते मुख्य सचिवांपर्यंत सर्वांनी या अभियानात सहभाग घेतल्याने स्वच्छता जागृतीचे एक जनआंदोलन उभे राहिल्याचे लोणीकर म्हणाले.
स्वच्छतेचे श्रेय गावागावांत काम करणा-यांचे
‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे देशात स्वच्छतेबद्दल जागृती झाली आहे़ देशात अलीकडच्या काळात स्वच्छतेचे जे काम झाले आहे त्याचे सारे श्रेय गावागावांत काम करणा-या स्वच्छता आग्रहींचे आहे, असे सांगतानाच ‘स्वच्छ तन, स्वच्छ मन, स्वच्छ भारत, मेरा परिचय’ या काव्यपंक्ती अमिताभ बच्चन यांनी उद्धृत केल्या.