'मी अन् प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो, पण...'; शरद पवारांचं भावनिक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 12:21 PM2023-08-03T12:21:03+5:302023-08-03T12:22:53+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील ना.धों. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

I and Pratibha continued to lift up his tired mind...; Sharad Pawar's emotional tweet of ND Mahanor | 'मी अन् प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो, पण...'; शरद पवारांचं भावनिक ट्विट

'मी अन् प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो, पण...'; शरद पवारांचं भावनिक ट्विट

googlenewsNext

मुंबई: निसर्गाशी एकरूप होऊन काव्यलेखन करणारे, बोली भाषेला आपल्या साहित्यात स्थान देऊन ते लोकप्रिय करणारे ज्येष्ठ कवी, लेखक ना. धों. महानोर (वय ८०) यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मूळ गावी पळसखेडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांना किडनीचा त्रास होता. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वाला धक्का बसला आहे. निसर्गकवी, रानकवी म्हणून त्यांना ओळखले जात असत. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. राज्यातून अनेकजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. ना.धों. महानोर यांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील ना.धों. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले.  ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत, असं शरद पवार म्हणाले.

ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धों. महानोर यांचे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो, असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे.

नामदेव धोंडो महानोर हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडा गावात झाला. तर जळगावात त्यांचं शिक्षण झालं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून ते शेतीत रमले. त्यांच्या रानातील कवितांनी सर्वांनाच निसर्गाच्या प्रेमात पाडलं. 'दिवेलागणीची वेळ','पळसखेडची गाणी','जगाला प्रेम अर्पावे','गंगा वाहू दे निर्मळ' ही त्यांची लोकप्रिय कवितासंग्रह आहेत. तर 'एक होता विदूषक','जैत रे जैत','सर्जा','अजिंठा' या काही सिनेमांमध्ये त्यांनी गीतरचना केली.  महानोर १९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. तर १९९१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

Web Title: I and Pratibha continued to lift up his tired mind...; Sharad Pawar's emotional tweet of ND Mahanor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.