मुंबई : आदर्श घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली चौकशीची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे. यावर आज मुंबईत अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी कोणतीही चुकीची काम केली नाहीत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मी समाधानी आहे.
आदर्श प्रकरणासंदर्भात यापूर्वीच आपल्या विरोधात खटला चालविण्यासाठी राज्यपालांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे पुन्हा खटला भरण्यास परवानगी मिळाली असती, तर हा चुकीचा पायंडा पडला असता. उच्च न्यायालयाने वस्तुस्थिती समजून घेत दिलेला निर्णय समाधानकारक असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, त्याबाबत मी काही बोलणार नाही, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.