मुंबई- गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. आता पुन्हा एकदा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काल एका कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी भाजपवरील ही नाराजी व्यक्त केली. काल दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली.
"कुस्तीपटूंशी संवाद साधायला हवा होता", महाराष्ट्रातील भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर
माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष माझा थोडाच आहे. भीती वाटणं हे आमच्या रक्तातच नाही. आम्ही कुणाला घाबरतच नाही, काही मिळालं नाहीतर मी ऊसतोडीसाठी जाईन, असं वक्तव्य मुंडे यांनी केलं. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याने त्या भाजपने नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
'भाजप खूप मोठा पक्ष आहे, मी फक्त त्यामध्ये काम करते. गोपीनाथ मुंडे यांनी मोठं काम केलं. मुंडे साहेबांनी अनेक आमदार, खासदार बनवले. यामुळे आता सरकार स्थापन करण्यापर्यंत प्रवास केला. मुंडे साहेब नेहमी म्हणायचे मी कधीही कुणासमोर झुकणार नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
कुस्तीपटूंशी संवाद साधायला हवा होता; खा. प्रीतम मुंडेंचा केंद्र सरकारला घरचा आहेर
देशभर गाजत असलेल्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही ही खेदाची बाब आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, अशी भूमिका भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने भाजपच्या वतीने ३० मे ते ३० जून या कालावधीत महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे.
दरम्यान, अभियानाची माहिती देण्यासाठी बुधवारी संघर्षयोद्धा भाजप जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. खासदार मुंडे म्हणाल्या, केवळ खासदारच नाही, तर एक महिला म्हणून मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. यातील सत्य समोर यायला हवे होते. लोकशाहीत ही घटना स्वागतार्ह नसल्याचे त्या म्हणाल्या.