मुंबई – राज्यात शिवसेना-भाजपा यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन बिनसल्यानंतर शिवसेनेने २५ वर्षाची युती तोडत काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. २०१९ च्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असं सरकार स्थापन झाल्यामुळे भाजपा एकाकी पडली. त्यामुळे भाजपाला मनसेसारख्या नव्या मित्राची गरज भासेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी निवडणुकीपूर्वी मोदी-शाह जोडीवर शरसंधान साधलं होतं. परंतु राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो आणि मित्र नसतो हे महाविकास आघाडीनं दाखवून दिलं. त्यामुळे भविष्यात भाजपा-मनसे युती होईल असं अनेकदा बोललं जातं. अलीकडेच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीनंतर भाजपा-मनसे(BJP-MNS) युतीच्या चर्चेला उधाण आलं. आगामी महापालिका निवडणुका पाहता भाजपा-मनसे जवळीक होईल असं राजकीय विश्लेषक सांगत आहे. परंतु अद्यापही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावर अधिकृत भूमिका मांडली नाही.
राज ठाकरेंच्या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेवायला बोलवलं तरी मी जाईल. राज ठाकरे प्रभावी नेते आहे. त्यांनी नवीन घरं बांधलं तेव्हा मी स्वत: त्यांना अभिनंदनांचा फोन केला. तेव्हा राज ठाकरेंनी कोविड काळामुळे कार्यक्रम घेता आला नाही. मात्र अनेक मित्रांना मी घरी बोलावलं. तुम्ही आणि वहिनी जेवायला या असं निमंत्रण त्यांनी दिलं. तेव्हा आम्ही जेवायला गेलो. राज ठाकरेंकडे खूप माहिती असते. राज ठाकरेंना प्रत्येक विषयाचं ज्ञान चांगले आहे. वेगवेगळ्या विषयावर आम्ही गप्पा मानल्या. आम्ही युती करण्यासाठी गेलो नव्हतो. भाजपा-मनसे युतीबाबत काहीही चर्चा नाही. सध्यातरी भाजपा स्वबळावर जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
पर्यायी सरकार देऊ
सत्ता परिवर्तनसाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करत नाही. अंतर्विरोधामुळे हे महाविकास आघाडी सरकार पडेल. सरकार कोसळेल वाटतं तेव्हा ते मजबूत होतं. भ्रष्टाचार या एका मुद्यावर महाविकास आघाडी सरकारला मजबूत ठेवलं आहे. सगळे मिळून महाराष्ट्राला कशाप्रकारे लुटता येईल हे पाहत आहे. परंतु एकवेळ असहनीय होईल. ज्यादिवशी सरकार कोसळेल तेव्हा पर्यायी सरकार भाजपा देईल. परंतु आम्ही कुठलेही प्रयत्न करत नाही. कोरोना काळात भाजपानं खूप चांगले काम केले. लोकांमध्ये जात आम्ही केले आहे. २०२४ पर्यंत भाजपा जनतेच्या मनात इतकी जागा करेल की तेव्हाच्या निवडणुकीत भाजपा एकटं सरकार स्थापन करेल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.