गोव्याची भाषा वेगळी हे मला मुंबईत गेल्यानंतर कळाले - दामोदर मावजो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 06:54 AM2021-12-08T06:54:10+5:302021-12-08T06:54:35+5:30

ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखकाशी संवाद

I came to know that Goa's language is different after going to Mumbai says Damodar Mauzo | गोव्याची भाषा वेगळी हे मला मुंबईत गेल्यानंतर कळाले - दामोदर मावजो

गोव्याची भाषा वेगळी हे मला मुंबईत गेल्यानंतर कळाले - दामोदर मावजो

googlenewsNext

सद्गुरू पाटील

माजोर्डा : मी गेली साठ वर्षे लिहितोय. साधारणत: १९६२ साली मी मुंबईला गेलो. तोपर्यंत तरी मराठी हीच आमची भाषा आहे व कोकणी ही बोली, असे मला वाटत होते; पण नंतर मुंबईतच माझा तो गैरसमज दूर झाला, असे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांनी खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. माजोर्डा येथील मावजो यांच्या निवासस्थानी ही मुलाखत घेतली गेली. 

लेखनाची प्रेरणा कुटुंबातील कुणाकडून मिळाली काय? 
आमच्या घरात कुणी साहित्य लिहीत नव्हते. मात्र, माझे आजोबा दामोदर यांना वाचनाची आवड होती. ते एके दिवशी घर सोडून गेले. ते का गेले व कुठे गेले हे आम्हाला कधीच कळले नाही. मात्र, सर्वस्व त्यागून ते गेले. माजोर्डा गावातच ते राहायचे. ते कदाचित ज्ञानाच्या शोधात गेले असावेत, असे मला वाटते. त्यांचेच नाव मला ठेवले गेले. 

तुमच्या व्यक्तिमत्त्वात कथाबीज कसे आले? 
मी कथाकार झालो. बालपणापासून प्रचंड वाचत राहिलो. लहान असताना मराठीच पुस्तके उपलब्ध होती. मला बालपणी साधारणत: चौथीत शिकताना टायफॉइड झाला होता. त्यामुळे मी घरीच होतो. वडिलांनी मला मडगावहून मराठीतील गोष्टींची दोन पुस्तके आणली होती. मी ती वाचून काढली. माझी आई चांगल्या प्रकारे गोष्टी सांगायची. 

तुमच्या साहित्य सेवेत पत्नीचे किती योगदान आहे? 
माझी पत्नी हीच माझ्या साहित्याची पहिली वाचक व टीकाकार. 

लिखाण कोकणीतच का? 
मी बाल्यावस्थेत मराठी वाचन केले. १९६२ साली मी मुंबईला गेलो. तिथे नाटकात काम केले. एकाने मला तुम्ही कुठचे असे विचारले. मी गोव्याचा म्हणून सांगितले. त्यावेळी त्या व्यक्तीने तरीच, मला वाटले होते, अशी प्रतिक्रिया दिली. मराठी नाटकातील तुमची भाषा वेगळी वाटली, असे मला त्या व्यक्तीने सांगितले. मलाही आमची भाषा वेगळी व ती कोकणी आहे हे तिथून कळू लागले. 

मोठे लेखक तुमचे कौतुक करतात तेव्हा काय वाटते व नव्या लेखकांना काय संदेश?

मी स्तुतीने हुरळून जात नाही. मात्र, एखादा दिग्गज लेखक माझी एखादी कथा आवडली म्हणून सांगतो तेव्हा चांगले वाटते. माझी कादंबरी वाचून अनंतमूर्ती यांनी मला फोन केला व कौतुक केले तेव्हा बरे वाटले होते. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला; पण लेखकांनी पुरस्कारांसाठी म्हणून लेखन करू नये, असा संदेश मी सर्वांनाच देऊ इच्छितो. देशात अनेक महान लेखक आहेत, जे ज्ञानपीठासाठी पात्र आहेत. माझ्यापेक्षाही ते चांगले लिहीत असावेत, असे मला वाटते. एका तपाच्या कालखंडात दोघा गोमंतकीयांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले. नव्या लेखकांनी लिहीत राहावे. लेखकांनी फायटरच असावे. निर्भीडपणे फेसिझमविरुद्ध लिहावे, बोलावे. गोव्यातील कोकणी लेखकांनी दुसऱ्या भाषेतीलही साहित्याचे वाचन करायलाच हवे; अन्यथा लेखनात मर्यादा येतात.

Web Title: I came to know that Goa's language is different after going to Mumbai says Damodar Mauzo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.