मी परिस्थिती कंट्रोल करु शकत नाही, शांतता टिकवणं आता मुख्यमंत्र्यांच्या हातात - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 05:06 PM2018-01-03T17:06:21+5:302018-01-03T17:18:14+5:30
महाराष्ट्र बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारा प्रकरणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हात वर केले आहेत.
मुंबई - महाराष्ट्र बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारा प्रकरणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. जो पर्यंत मला शक्य होते तितकी मी परिस्थिती नियंत्रणात ठेवून शांततेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आता यापुढे शांतता कशी टिकवायची ते मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे.
भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्मृती स्तंभाला अभिवादन करण्याचे ठरले. त्यासाठी अनेक संघटना एकत्र आल्या होत्या. या सर्व संघटनांची वेगवेगळी मते आहेत. त्या सर्व संघटनांना मी नियंत्रणात ठेऊ शकत नाही त्यामुळे शांतता कशी टिकवायची ते आता मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा बुधवारी संध्याकाळी प्रकाश आंबेडकर यांनी केली. भीमा कोरेगाव घटनेतील मुख्य सूत्रधार शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आहेत. जो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना लावा. तसेच, त्या दोघांना सरकारने अटक करावी, अशी मागणी केली. याचबरोबर काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
महाराष्ट्र बंद मागे घेत असून राज्यातील 50 टक्के जनता आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाली होती. आजचा बंद शांततेत पार पडला. तसेच, आजचा संप फक्त दलित बांधवाचा नव्हता, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.