...मी कात टाकली!

By admin | Published: September 13, 2015 03:45 AM2015-09-13T03:45:29+5:302015-09-13T03:45:29+5:30

गेल्या चार वर्षांच्या एकत्रित वाटचालीत दोघींनी आपला ग्राहकाधार चांगलाच वाढवला आहे. अभिनेत्री मधुरा वेलणकर, नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे, ऋतुजा देशमुख, राधिका

... I cast my bones! | ...मी कात टाकली!

...मी कात टाकली!

Next

- प्रशांत असलेकर (टर्निंग पॉइंट)

गेल्या चार वर्षांच्या एकत्रित वाटचालीत दोघींनी आपला ग्राहकाधार चांगलाच वाढवला आहे. अभिनेत्री मधुरा वेलणकर, नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे, ऋतुजा देशमुख, राधिका हर्षे, तसेच एक अतिशय प्रसिद्ध गायिका या त्यांच्या नियमित ग्राहकांपैकी काही आहेत. पूर्वी त्यांचा व्यवसाय घरातून चालायचा. विक्री मुख्यत: प्रदर्शनांतून व्हायची. व्यवसायाला स्थिर स्वरूप देण्यासाठी व ग्राहकांना संपर्कक्रें द्र म्हणून त्यांना एका दुकानाची गरज वाटू लागली. त्यातून अनेक निकषांवर उतरणारे हे दुकान त्यांना खूप शोधानंतर मिळाले. दुकान उघडल्यापासून त्यांच्या व्यवसायाला स्थैर्य प्राप्त झाले आहे.

पल्लवी आणि भक्ती या दोघींच्या वाटचालीत त्यांचे प्रोत्साहन देणारे पती मंदार रानडे व अजित परब यांचा मोठा वाटा आहे. किंबहुना त्यांच्या नैतिक व आर्थिक पाठिंब्यामुळेच अल्पावधीत मोठा पल्ला गाठणे दोघींना शक्य झाले. पल्लवी रानडे म्हणतात की, आपले एखादे स्वप्न असेल तर ते सोडू नये. त्याचा पाठपुरावा करावा. कधीतरी त्याल अनुकूल परिस्थिती निर्माण होतेच. भक्ती परब म्हणतात, जर तुमचे व्यवसायाचे क्षेत्र मनापासून आवडत नसेल तर दीर्घकाळ त्यात राहू नका. व्यवस्थित रीतीने थोडे आर्थिक व्यवस्थापन केले तर व्यवसाय बदलणे शक्य आहे. त्यासाठी आधी थोडी तयारी, मार्केट सर्व्हे करावा. पर्यायी व्यवसायाचे काही प्रयोग करून बघावेत. त्यांना यश आले की आपला आत्मविश्वास वाढतो. मग क्षेत्र बदलणे सोपे जाते.

प्रत्येकाचं लहानपणी एक स्वप्न असतं की आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला मिळावं. लहानपणीचं ते स्वप्न अस्पष्ट असतं. त्यात तपशिलाचे रंग नसतात. नैसर्गिक आवडीचे क्षेत्र व्यवसाय म्हणून निवडण्यात धोका असतो. म्हणून जेव्हा पोटापाण्याचा व्यवसाय निवडायची वेळ येते तेव्हा सरळधोपट मार्गच निवडला जातो. पण मनातलं स्वप्न मात्र अंतर्यामी साद घालत राहतं. काही मनस्वी लोक मात्र अंतरीच्या आवाजाला साद देऊन आवडीच्या क्षेत्रात परत येतात.
दादरला सेनाभवनजवळ आभा नावाचे एक बुटीक किंवा महिलांच्या कपड्यांचे दुकान आहे. पल्लवी रानडे आणि भक्ती परब या मैत्रिणी ते चालवतात. त्या दोघींच्याही बाबतीत हेच घडले आहे. या दोघींपैकी पल्लवी रानडे या मूळच्या अंबरनाथच्या. तेथील बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पटवे यांच्या त्या कन्या. मराठी तरुणांनी आवर्जून व्यवसायातच आले पाहिजे असा पटवे यांचा आग्रह असायचा. तो त्यांच्या कन्येला भावला नसता तरच नवल. फॅशन डिझाईनिंग, ड्रेस डिझाईनिंग, पॅटर्न डेव्हलपिंग याची त्यांना लहानपणापासून आवड होती. स्वत:चे कपडे स्वत: विकसित करायला आवडायचे. तसेच मोठेपणी आपले बुटीक असावे असे स्वप्नही होते. पण जेव्हा करिअरचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा केला. नंतर त्या क्षेत्रात सहा वर्षे नोकरी केली. विवाहानंतर त्या चिपळूणला गेल्या. तिथेही मेडिकल स्टोअर चालवले. मग पती मंदार यांच्या वकिली व्यवसायामुळे त्या दादरला राहायला आल्या. काही काळ त्यांनी आपल्या मुलाच्या संगोपनावरच लक्ष केंद्रित केले. त्यांच्या मुलाबरोबर शिकणाऱ्या दुसऱ्या मुलाची आई भक्ती परब त्यांना तिथे भेटल्या. दोघींनाही फॅशन डिझाईनिंगची आवड असल्याने सूर जुळले. दोघींनी कात टाकली. आपापले शैक्षणिक संदर्भ विसरून एका नव्याच क्षेत्रात ओळख निर्माण करायला सुरुवात केली.
भक्ती परब या मुळात चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांनी अनेक वर्षे नोकरी केली. गायक संगीतकार अजित परब यांच्याशी विवाह आणि अपत्यप्राप्तीनंतर घर, नोकरी आणि मुलाचे संगोपन या तिन्ही आघाड्यांना आपण न्याय देऊ शकत नाही हे त्यांच्या लक्षात आले. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आकार घेऊ शकेल असा व्यवसाय कोणता? याचा विचार करता फॅशन डिझायनिंगचा पर्याय त्यांच्या नजरेसमोर आला. मग काही काळ नोकरी सांभाळून त्यांनी या व्यवसायाची चाचपणी केली. आधी काही ड्रेसेस बनवले. ते संभाव्य ग्राहकांना दाखवले. त्यांच्याकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्यावर आपण योग्य दिशेने वाटचाल करतो आहोत याची त्यांना खात्री पटली. मग नोकरी सोडून त्यांनी फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात नवी इनिंग सुरू केली. याच टप्प्यावर त्यांना पल्लवी रानडे भेटल्या. पुढची वाटचाल या दोघींनी एकत्रितपणे केलेली आहे. या दोघींनी आधी स्वत:च्या मनाने विविध प्रकारचे लेडीज ड्रेसेस डिझाईन केले. ते शिवून घेतले. त्यांनी आधी घरीच आपल्या मनाने ड्रेसेस बनवले. सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी भरणारी प्रदर्शने हेच त्यांच्या विक्रीचे माध्यम होते. २०१०च्या दिवाळी प्रदर्शनात मीनल मोहाडीकर यांच्या सहकार्यामुळे आयत्यावेळी भाग घेऊ शकल्या. त्या प्रदर्शनात त्यांनी बनवलेले सर्व कपडे विकले गेले. त्यामुळे दोघींचा आत्मविश्वास वाढला. त्या प्रदर्शनाने त्यांना काही नियमित ग्राहकही मिळवून दिले.
आज या दोघी आपल्या व्यवसायात स्थिर आहेत. त्या माहेश्वरी, चंदेरी, सिल्क, कॉटन, जयपूर, दाबू प्रिंट अशा वेगवेगळ्या प्रकारचे कपड्यांचे तागे आणतात. काही कपडे गुजरातेतील अज्रक या प्रसिद्ध ब्लॉक प्रिंट प्रकारचे असतात. हा पूर्ण व्यवसायच मेक टू आॅर्डर प्रकारचा आहे. प्रत्येक ग्राहकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बनवावे लागते. ते बनवताना त्या ग्राहकाचे वय, व्यवसाय, शरीराची ठेवण यांचा विचार करावा लागतो. एम्ब्रॉयडरी, लेसपट्टी यांचा हे डे्रसेस अधिक खुलवण्यासाठी वापर केला जातो. ग्राहकांशी विचारविनिमय करूनच ड्रेसचा पॅटर्न ठरतो. त्यानुसार तो शिंप्याकडून शिवून घेतला जातो. चुकभुलीने वेगळा पॅटर्न बनला गेला तर त्यात विनामूल्य दुरुस्ती करण्याएवढी व्यावसायिकता दोघीही पाळतात.

Web Title: ... I cast my bones!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.