‘आयएएस’ अधिकारी व्हायचे बालपणीच ठरवले होते. मात्र, काही ना काही कारणाने त्यात अडथळे येत होते. व्हिजेटीआयमधून इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर ‘आयआयएम बंगळुरू’मधून ‘एमबीए’ पूर्ण केले. त्यानंतर खासगी बँकेत नोकरी केली. तेथे सहा वर्षांच्या सेवाकाळात सहायक उपाध्यक्षपदापर्यंत झेप घेतली. पण, बालपणी पाहिलेले स्वप्न शांत बसू देत नव्हते. अखेर निश्चय केला आणि २०२० मध्ये नोकरी सोडली.
पहिला फॉर्म भरला तेव्हा काहीच तयारी नव्हती. त्यामुळे अपयश पदरात पडले. पण खचून न जाता पुन्हा अभ्यास सुरू केला. माझे कार्यालयातील सहकारी मनीष कुमार यांची चार वर्षांपूर्वी आयएएसपदी निवड झाली. त्यांनी सहकार्य केले. हैदराबादमधील महेश भागवत (आयपीएस) यांचेही मार्गदर्शन मिळाले.
बातम्या बारकाईने वाचते...चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षेचा पाया आहे आणि त्यामुळे तयारीसाठी वर्तमानपत्र हे प्रमुख माध्यम आहे. त्यामुळे मी नियमित पेपर वाचते. मुलाखतीची तयारी करताना अधिकाधिक भर हा वर्तमानपत्रांतील बातम्यांवर होता. मागचे दोन-तीन महिने तर प्रत्येक बातमी बारकाईने वाचली.
जन्म रत्नागिरीचा, शिक्षण मुंबईत
माझा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये झाला. वडिलांची बदली झाल्यानंतर आम्ही मुंबईत दादरला राहायला आलो. वडील कोकण विकास महामंडळात सेवेत होते. माहेरी आई, वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे. सध्या पती विद्याधर श्रीधर, सासरे आणि दीर यांच्यासह मी हैदराबादला राहते. विद्याधर यांनीही आयआयएम बंगळुरूमधून एमबीए केले आहे.
तीन स्तरांत हाेते परीक्षा
नागरी सेवा परीक्षा दरवर्षी प्राथमिक, मुख्य व मुलाखत अशा तीन स्तरांत घेतली जाते. त्या परीक्षेत यश संपादन केलेल्या उमेदवारांची इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (आयएएस), इंडियन फॉरिन सर्व्हिस (आयएफएस), इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये (आयपीएस) अधिकारीपदी निवड केली जाते.