मुंबई- बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर या केंद्रीय यंत्रणांकडे यंत्रणाच नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. आपल्याकडे चिमूटभर सापडलं तर केवढा गहजब केला जातो. महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे. तुम्ही महाराष्ट्राचा आधार म्हणून उपयोग का करत नाही. महाराष्ट्र जणूकाही देशातला सगळ्यात सडका भाग आहे अशा पद्धतीने राजकारण चाललंय, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे. ते 'लोकसत्ता'च्या ७४व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, संधी प्रत्येकाला मिळते, त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची, हे ज्याचं त्यानं बघायचं असतं. ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्या संधीची माती करायची असेल, तर तुम्ही कपाळकरंटे आहात. प्रत्येकाचे दिवस असतात. दिवस बदलतात. ते लवकर बदलतील यासाठी प्रयत्न करू नका. सत्ता मिळवा पण ती लोकशाहीच्या मार्गाने मिळवावी. सगळं काही मलाच पाहिजे, सत्तेचा दुरुपयोग करुन पुन्हा सत्ता मिळवण्याच्या वृत्तीमुळे देशाचं राजकारण नासवलं आहे. हा सत्तापिपासूपणा जो काही आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.
आमच्यावर कुणी राजकारण लादलेलं नाही. माझीही आदित्यसारखी राजकारणात सुरुवात होत होती. मला बाळासाहेब म्हणाले होते की उद्धव एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर लादणार नाही. जनतेवर लादणार नाही. पण तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणार देखील नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसेच आवाज तोच आहे त्यातला खणखणीत पणा तोच आहे. पण पिढीप्रमाणे थोडा बदल व्हायला हवा. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, ते कधीच सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जनतेची सेवा करणारी आमची सहावी पिढी आहे. त्याच्या आधीही आमचे पूर्वच धोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार होते असं म्हणतात. माझ्यावर टीका झाली की याला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही. मला नाहीच येत. मी भाषण करतो असं मला वाटत नाही. मला भाषण करताच येत नाही हे तुम्ही लोकांनीच ठरवून टाकलं हे बरंच झालं, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
पुन्हा भाजपासोबत आघाडी होईल का?
ते ज्या पद्धतीने चालले आहेत, ते सुधारणार आहेत का? सुरुवातीच्या काळात आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती. पण आता वैचारिक पातळी पाताळात गेलीये का तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची याबाबत त्यांचाच कित्ता आता आम्ही गिरवला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.