Join us

‘हेमाला मारण्यास सांगितलेच नव्हते’

By admin | Published: December 29, 2015 2:04 AM

हेमाला मारण्यास कुणालाही सांगितले नव्हते. तथापि, तिच्याबद्दल काही माहिती मात्र मी मिळवत होतो. अर्थात ही माहिती मला घटस्फोटासाठी हवी होती, असा दावा हेमाचा पती चिंतन उपाध्यायने

- डिप्पी वांकाणी,  मुंबईहेमाला मारण्यास कुणालाही सांगितले नव्हते. तथापि, तिच्याबद्दल काही माहिती मात्र मी मिळवत होतो. अर्थात ही माहिती मला घटस्फोटासाठी हवी होती, असा दावा हेमाचा पती चिंतन उपाध्यायने पोलीस तपासात केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपी विद्याधरला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.चिंतनची चौकशी सध्या सुरू आहे. तो हेमाच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. चिंतनच्या जुहू येथील निवासस्थानातून काही स्केचेस जप्त करण्यात आली आहेत. याचा खून प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे. चिंतनने सांगितले की, हेमाच्या अंधेरी येथील स्टुडिओची छायाचित्रे काढण्यास मी विद्याधरला सांगितले होते. पण ही छायाचित्रे मला घटस्फोटासाठी लागत होती. कारण मला न्यायालयात हे सांगायचे होते की, हेमा ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि तिला माझ्याकडून पैशांची गरज नाही. तर आपला या खून प्रकरणात हात नसल्याचेही चिंतन सांगत आहे. मात्र, पोलिसांना चिंतनबाबत नवी माहिती मिळत आहे. चिंतनच्या स्केचेसमध्ये मी तुला संपवून टाकेन, अशा आशयाचे स्केचेस होते. याचा थेट खुनाशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणातील एक आरोपी विद्याधरचा शोध पोलीस घेत आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात विद्याधरला व्यवसायात मोठा तोटा झाला होता. विद्याधरचे वडील हयात होते तोपर्यंत विद्याधरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. मात्र, नंतर विद्याधरला इमिटेशन ज्वेलरीच्या व्यवसायात तोटा झाला. घटनास्थळी नेऊन चिंतनची चौकशी करण्यात येणार आहे का? असे विचारले असता सूत्रांनी सांगितले की, विद्याधरला पकडणे हे आमचे पहिले लक्ष्य आहे. तर चिंतनच्या काही चाचण्या करण्याबाबतही अद्याप विचार केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चारही आरोपींना न्यायालयीन कोठडीशिल्पकार हेमा उपाध्याय (४२) आणि त्यांचे वकील हरिश भंबानी (६५) यांच्या हत्येप्रकरणातील चौघा संशयित आरोपींना सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. या प्रकरणी मुख्य सूत्रधार व हेमा हिचा पती चिंतन उपाध्याय पोलीस कोठडीत असून, मुख्य हल्लेखोर विद्याधर राजभर उर्फ गोटू हा अद्याप फरार आहे. दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी आझाद राजभर, विजय राजभर, शिवकुमार राजभर उर्फ साधू यांना अटक केली होती.